
बीड शहरामध्ये अल्पवयीन मुलीवर तीन दिवसांपूर्वी अत्याचाराची घटना घडली होती. या घटनेत गुन्हा दाखल करण्याऐवजी आरोपीला मदत करण्याचा प्रयत्न पोलीस कर्मचाऱ्याने केल्याचा आरोप होत होता. आरोपींना मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सांगीतले होते. आता या प्रकरणात तडजोड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस हवालदारला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. या घटनेचा तपास स्थानिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
बीड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका शाळकरी मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात तक्रार देऊनही पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास निष्काळजीपणा दाखवला त्यानंतर पीडितेच्या वडिलांनी पोलीस अधिक्षकांकडे धाव घेतली. अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या आदेशावरून पीडितेचा जबाब नोंदवून घेण्यात आला. तातडीने गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर या प्रकरणातील पोलीस कर्मचारी सत्यवान गर्जे यास प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. हा तपास स्थानिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.























































