रस्त्यावरील व्यावसायिकांवर पालिकेची कारवाई; संतप्त व्यावसायिकांचा नगराध्यक्षांच्या घरासमोर ठिय्या

700

कोपरगावातील संभाजी सर्कल येथे बसलेल्या व्यावसायिकांवर रविवारी सकाळी 7 वाजता पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करून भाजीपाला जप्त केला. त्यानंतर संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. या घटनेने आणि पालिकेच्या कारवाईने संतप्त झालेले सुमारे दीडशे भाजीपाला विक्रेत्यांचा मोर्चा थेट नगराध्यक्षांचा घरावर गेला.

नगराध्यक्ष घराबाहेर येत नसल्याचे पाहून महिलांनी जोरदार हाय हाय च्या घोषणा देत दारासमोर रस्त्यावरट ठिय्या मांडला. शहरभर अनेक ठिकाणी बेकायदा भाजीपाला विक्रीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपालिकेने दैनंदिन भाजीपाल्यासाठी नेहरू भाजी मंडई खुली केली. तसेच डेपोतील नव्या ओट्यावर मंगळवारी व शुक्रवारी या दिवशी विक्रीस परवानगी दिली. या ठिकाणी नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळून भाजीपाला खरेदी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आठवड्याचा भाजीपाला एकदाच घ्या आणि भाजीपाला खरेदी करण्यासाठी गर्दी टाळा, असे आवाहन पालिकेकडून करण्यात येत आहे.

व्यावसायिक महिलांना पुढे करून आपल्याला बदनाम करण्याचे राजकारण केले जात असल्याचा आरोप नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केला. तसेच पुन्हा असा मोर्चा काढला किंवान सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नाही, तर कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. तर व्यापाऱ्यांनीही त्यांची बाजू मांडली.आठवडे बाजार बंदीमूळे आमच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून उपासमारीची वेळ आली आहे. पालिकेने डेपोत जागा देत मंगळवारी आणि शुक्रवारी विक्रीला परवानगी दिली आहे. ते आम्हाला मान्य नाही. रविवारचा बाजार समजून रस्त्यावर दुकाने थाटली. परंतु पालिकेने पोलिसांना बोलावून आमचा माल जप्त करून आमच्यावर लाठीचार्ज केला आणि माल भरून नेला, फेकून देण्याची धमकी दिली, असे व्यावसायिकांनी सांगितले. पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी व्यापाऱ्यांना रस्त्यावर कुठेही बसायचे नाही, डेपोतील ओट्यावर बसायचे व भाजीपाला विकायचा असे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या