महागड्या कोकेनचे शौकीन कोण? पोलीसांची दोन पथके राजस्थान, हरियाणाला होणार रवाना

53

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

मिरजोळे एमआयडीसी परिसरात सापडलेल्या 50 लाख रुपयांच्या कोकेनमुळे कोकणात खळबळ माजली. कोकेनची तस्करी हरियाणातून झाल्याचे प्रथमर्दनी दिसून येत असल्याने पोलीसांची दोन पथके पुढील तपासासाठी हरियाणा आणि राजस्थानला रवाना होणार आहेत़ दरम्यान गांजा, केटामाईननंतर महागड्या कोकेन शौकीन कोण आहेत? याचा शोध आता पोलीसांना घ्यावा लागणार आहे़

शनिवारी रात्री मिरजोळे एमआयडीसी परिसरात रत्नागिरी पोलीसांनी 936 ग्रॅम कोकेन पकडले. या प्रकरणात दिनेश शुभेसिंह, सुनिलकुमार नरेंद्रकुमार रणवा, रामचंद्र तुलीचंद मलीक या तिघांना पोलीसांनी अटक केली असून त्यांची रवानगी 29 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आली आहे़ ग्रामीण पोलीस या प्रकंरणाचा अधिक तपास करत असून आरोपी दिनेश शुभेसिंह हा हरियाणामधून आला असल्यामुळे आणि इतर दोन आरोपी तटरक्षक दलाचे कर्मचारी असले तरी ते मुळचे हरियाणा आणि राजस्थान येथील आहेत़. त्यामुळे या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्याकरीता पोलीसांची दोन पथके तयार करण्यात आली असून ती पथके हरियाणा आणि राजस्थान येथे रवाना होणार आहेत़

कोकेन तस्करीमध्ये तटरक्षक दलातील सुनिलकुमार नरेंद्रकुमार रणवा आणि रामचंद्र तुलीचंद मलीक हे दोन कर्मचारी असल्याचे आढळून येताच एकच खळबळ उडाली. तब्बल 50 लाख रुपये किंमतीचे 936 ग्रॅम वजनाचे कोकेन पोलिसांनी जप्त केले असून आता ही तस्करी किती दिवस सुरु होती, महागड्या कोकेनचे रत्नागिरीत कोण  शौकीन आहेत? कोकेन अंमली पदार्थाने कोकणाला विळखा घातला आहे का? याचा पोलिसांना शोध घ्यावा लागणार आहे़

आपली प्रतिक्रिया द्या