
एकिकडे देशात वादळी वाऱ्यासह पावसाचं आगमन झालेलं असताना दुसरीकडे पंतप्रधानांच्या भाषणावरून राजकीय वर्तुळात चर्चेचं वादळ निर्माण झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनिफॉर्म सिव्हील कोड म्हणजेच समान नागरी कायद्यावर तसंच तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर दिलेल्या भाषणावरून राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
काँग्रेस, एमआयएम, जदयू अशा विविध पक्षांनी पंतप्रधानांच्या भाषणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी बेरोजगारी, गरिबी, महागाई तसंच मणिपूरच्या मुद्द्यावरून पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. तर याच मुद्द्यावर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी टीका केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या विचारांचं सॉफ्टवेअर बदललं पाहिजे, अशी टीका ओवैसी यांनी केली आहे.
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, हिंदुस्थाच्या मुसलमान बंधु भगिनींना हे समजायला हवं की कोणता राजकीय पक्ष त्यांच्या भावना भडकावून त्याचा राजकीय फायदा उकळत आहे. समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावरून लोकांची माथी भडकवण्याचं काम केलं जात आहे. एकाच घरात एकासाठी एक नियम आणि दुसऱ्यासाठी दुसरा नियम असेल, तर ते घर चालणार का? अशा दुटप्पी यंत्रणेसह देशाचा कारभार कसा पुढे जाईल? देशाच्या संविधानातही नागरिकांना समान अधिकार मिळावेत, असा उल्लेख करण्यात आल्याचं पंतप्रधान आपल्या भाषणात म्हणाले.
त्यावर प्रत्युत्तर देताना ओवैसी यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, पंतप्रधांनी आधी हे समजून घ्यावं की, अनुच्छेद 29 एक मूलभूत अधिकार आहे. हे बहुधा पंतप्रधानांना कळलेलं नाही. संविधानात धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा नमूद करण्यात आला आहे. इस्लाममध्ये लग्न हा एक करार आहे, हिंदूंमध्ये ते जन्मोजन्मीचं नातं आहे. तुम्ही हे सगळं एकत्र करणार आहात का? हिंदुस्थानची विविधता ही त्यांना एक समस्या वाटते. पंतप्रधानांना पाकिस्तानविषयी इतकं प्रेम का वाटतं? त्यांनी आपल्या विचारांचं सॉफ्टवेअर बदलायला हवं. हिंदुस्थानच्या मुसलमानाला पाकिस्तान, इजिप्तशी काय घेणंदेणं आहे? तुम्ही त्यांना मोठं आणि आम्हाला लहान समजत आहात का? असं असेल तर ही देशविरोधी गोष्ट आहे, अशी टीका ओवैसी यांनी केली आहे.
तर काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी पंतप्रधान महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य का करत नाहीत असा प्रश्न उपस्थित केला आहे. बेरोजगारी, गरिबी, महागाई, मणिपूर हिंसाचार अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठीच ते असं बोलतात, अशी टीका वेणुगोपाल यांनी केली आहे. तर जदयू नेते के. सी. त्यागी यांनी समान नागरी कायदा हा असा विषय आहे, ज्यावर सर्व पक्षांनी बोलणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. भाजप हा धार्मिक ध्रुवीकरणाचं भांडवल करून फक्त मतांचं राजकारण करतो, असं टीकास्त्र त्यागी यांनी सोडलं आहे.



























































