
मुंबई इंडियन्सचा उपकर्णधार कायरॉन पोलार्डने आपल्या संघाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून हार्दिक आणि कृणाल या पंडय़ा बंधूंवर स्तुतिसुमने उधळली. आमच्या संघात हार्दिक शेर आहे, पण कृणालही सव्वाशेर आहे. कारण मैदानावर त्याला हार्दिकपेक्षाही अधिक समज असते, अशा शब्दांत पोलार्डने पंडय़ा बंधूंचे कौतुक केले.
वेस्ट इंडीजचा हा बलदंड क्रिकेटपटू असलेला पोलार्ड म्हणाला, पंडय़ा बंधूंशी माझी चांगली केमेस्ट्री जुळते. आमचे नाते हे सांस्कृतिक सीमारेषेच्या पलीकडचे आहे. आम्ही तिघेही अष्टपैलू क्रिकेटपटू असून फटकेबाजी हा आमच्यातील समान धागा आहे. दुसऱयाला मदत करण्याच्या बाबतीतही पंडय़ा बंधू आणि माझ्यात साम्य आहे. मैदानावरही आम्ही या सहकार्याच्या भावनेतून उतरत असतो. हार्दिक आणि कृणाल दोघेही मनमोकळय़ा स्वभावाचे आहेत. आत्मविश्वास आणि स्वतःचे समर्थन करणे या बाबतील हार्दिक आणि मी सारखाच आहे. शिवाय चेंडूला मैदानाबाहेर भिरकावण्यासाठी आम्हाला ओळखले जाते. ‘आयपीएल’च्या माध्यमातून आमच्यात जिव्हाळय़ाचे नाते निर्माण झाले आहे, असेही पोलार्डने सांगितले.

























































