पोलार्ड पुन्हा विंडीजसाठी खेळणार, आयपीएलमुळे आशा पल्लवित

56

सामना प्रतिनिधी, मुंबई

कायरॉन पोलार्डने बुधवारी मध्यरात्री मुंबई इंडियन्सला किंग्ज इलेव्हन पंजाबवर एकहाती सनसनाटी विजय मिळवून दिला. ही वादळी खेळी कायरॉन पोलार्डसाठी टर्निंग पॉइंट ठरू शकते. वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाच्या ‘ब्लॅकलिस्ट’मध्ये गेलेल्या कायरॉन पोलार्डसाठी वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचे दरवाजे पुन्हा उघडे होऊ शकतात. यावर दस्तुरखुद्द कायरॉन पोलार्ड म्हणाला, वेस्ट इंडीज क्रिकेटमध्ये नवे बदल झालेत. नव्या व्यक्तींकडे जबाबदारी सोपवण्यात आलीय. वेस्ट इंडीजसाठी पुन्हा खेळण्याची संधी मिळाल्यास नक्कीच आवडेल.

कायरॉन पोलार्डने आपली झंझावाती खेळी पत्नी हिला वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून समर्पित केली. किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार रविचंद्रन अश्विननेही त्या खेळीचे मनभरून कैतुक केले. सिने अभिनेता रणवीर सिंग याने तर कायरॉन पोलार्डला ‘राक्षस’ म्हणून संबोधले. कायरॉन पोलार्डने या खेळीमध्ये नवा विक्रमही रचला. त्याने सर्वप्रकारच्या ट्वेण्टी-20 क्रिकेटमध्ये एकूण 602 षटकार मारले आहेत.

वर्ल्ड कप जिंकण्याची क्षमता
वेस्ट इंडीज वर्ल्ड कप जिंकू शकतो का, असा प्रश्न पत्रकाराकडून करण्यात आल्यानंतर कायरॉन पोलार्ड म्हणाला, नक्कीच. ख्रिस गेल वयाच्या 39 व्या वर्षी शानदार फलंदाजी करतोय. आंद्रे रस्सेलही तुफान फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे वर्ल्ड कप जिंकण्याची क्षमता नक्कीच आमच्यामध्ये आहे.

आपली प्रतिक्रिया द्या