
तब्बल 7 वर्षांनी जयसिंगपूर बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली असून, 28 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्यात आता हालचाल गतिमान झाल्या असून, सर्वपक्षीय नेत्यांची भूमिका यामध्ये महत्त्वाची असणार आहे.
जयसिंगपूर बाजार समितीत 18 जागा निवडून द्यावयाच्या आहेत. शिरोळ तालुक्यातील 52 ग्रामपंचायतींचे 668 सदस्य, 153 सेवा सोसायटय़ांचे 1910 संचालक, आडते व व्यापारी प्रतिनिधी 356 तर हमाल व तोलाई 87 असे 3 हजार 21 मतदार आहेत. बाजार समितीसाठी विकास सेवा सोसायटय़ातून 11 जागा निवडून द्यायच्या आहेत.
यात 7 सर्वसाधारण, 2 महिला, 1 भटक्या जाती व विमुक्त जाती-जमाती, 1 ओबीसी, ग्रामपंचायतीतून 4 जागा निवडून द्यायच्या असून, यात 2 सर्वसाधारण, 1 आर्थिक दुर्बल, 1 अनुसूचित जातीचे प्रतिनिधी, आडते व व्यापारी प्रतिनिधी 2 जागा, तर तोलाई व हमाल 1 अशा 18 जागांसाठी निवडणूक होणार आहे. पूर्वी 19 जागा होत्या. यातील सहकारी व्यापारी मतदार रद्द झाल्याने आता होणारी निवडणूक ही 18 जागांसाठी होणार आहे.
यापूर्वी दोनदा जाहीर झालेला निवडणूक कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. त्यानंतर नूतन निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांना संधी मिळाल्यानंतर नव्याने मतदार याद्या करण्यात आल्या आहेत. यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे महाराष्ट्र राज्य सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. 7 वर्षानंतर निवडणूक लागल्याने आजी – माजी संचालक, आमदार यांच्यासह सर्व पक्षीय नेते तयारीला लागले आहेत.
निवडणूक कार्यक्रम
नामनिर्देशन दाखल करण्यासाठी मुदत 3 एप्रिलपर्यंत मुदत आहे. 5 एप्रिलला छाननी, 6 एप्रिल रोजी यादीची प्रसिद्धी, तर 6 एप्रिल ते 20 एप्रिलअखेर माघारीसाठी मुदत आहे. त्यानंतर 21 एप्रिल रोजी उमेदवारांना चिन्हाचे वाटप आणि 28 एप्रिल रोजी मतदान होईल. मतदानानंतर 3 दिवसांच्या आत मतमोजणी होणार आहे. यासाठी तालुक्यातील लोकप्रतिनिधी कसे निवडणुकीला सामोरे जातात, याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.




























































