
एकीकडे घरात लगीनघाई सुरू असतानाच फिजिओथेरपिस्ट डॉ. पूजा हेमनानी यांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यांना कमरेखाली हालचाल करणे अशक्य झाले. मात्र केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर आणि डॉक्टरांनी योग्य वेळी केलेल्या शस्त्रक्रियेने पूजा लग्नाच्या काही दिवस आधीच स्वतःच्या पायावर पुन्हा उभी राहिली.
फिजिओथेरपिस्ट असणाऱया डॉ. पूजा हेमनानी यांचे लग्न अवघ्या दोन आठवडय़ांवर आले होते. याच दिवसांत एका सकाळी झोपेतून उठण्याच्या प्रयत्नात असलेल्या डॉ. हेमनानी यांना आपण कमरेखाली निकामी झाल्याचे लक्षात आले. त्यावेळी वरिष्ठ डॉक्टरांच्या सूचनेनुसार 11 नोव्हेंबर रोजी त्यांना मुंबई सेंट्रल येथील वोकहार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्पाइन सर्जन डॉ. मजदा तुरेल यांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. एमआरआय काढला असता पाठीच्या कण्यामध्ये रक्ताची गुठळी आढळून आली. ही रक्ताची गुठळी मणक्याला पूर्णपणे दाबत होती, त्यामुळे पूजा यांना कमरेखाली हालचाल करणे शक्य होत नव्हते. ती रक्ताची गुठळी तत्काळ शस्त्रक्रियेने काढून टाकण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर दोनच दिवसांत पूजा या आधार घेऊन चालू लागल्या. आठवडाभरानंतर पूजा यांनी आधाराशिवाय चालण्याचा प्रयत्न सुरू केला आणि इच्छाशक्तीच्या जोरावर पूजा 10 दिवसांतच स्वतःहून चालू लागल्या. त्यांच्या होणाऱया नवऱयानेही त्यांना साथ दिली.
थाटामाटात झाला विवाह
जोपर्यंत ती स्वतः चालत नाही तोपर्यंत तिला रुग्णालयातून सोडण्यात येणार नाही, असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले होते. पण जयचे प्रेम आणि डॉक्टरांवरचा विश्वास यामुळेच मी स्वतःच्या पायावर चालू शकले, अशी प्रतिक्रिया डॉ. पूजा यांनी दिली. त्यांचे लग्नही वेळेवर मोठय़ा थाटामाटात पार पडले.

























































