
राज्यातील रस्त्यांची दुरवस्था दिवसेंदिवस वाढत असल्याने अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. रस्त्यांच्या देखभालीअभावी ब्लॅकस्पॉटचे (अपघातप्रवण क्षेत्र) प्रमाणही वाढत आहे. राज्याच्या गृह विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यातल्या 36 जिल्ह्यांमधील रस्त्यांवर तब्बल 869 ब्लॅकस्पॉट असल्याची आकडेवारी पुढे आली आहे.
राज्यात या वर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत राज्यात एकूण 33 हजार 2 अपघात झाले असून, त्यामध्ये 14 हजार 66 जणांचा मृत्यू झाला आहे. मागील वर्षी याच कालावधीत 32 हजार 784 अपघातांमध्ये 14 हजार 185 मृत्यू झाले होते.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर जानेवारी ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत 82 अपघाती मृत्यू झाले, तर 2025 मध्ये या महामार्गावर अपघातात 61 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील रस्ते सुरक्षेच्या संदर्भात सर्वोच्य न्यायालयात एक याचिका दाखल झाली होती. रस्ते अपघातांच्या संदर्भात न्यायालयाला अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने रस्ते सुरक्षा समितीची स्थापना केली होती. या समितीने रस्ते सुरक्षाविषयक कामकाजासाठी स्वतंत्रपणे रस्ता सुरक्षा निधी उभारण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने 923 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या निधीतून राज्याच्या वेगवेगळ्या भागांतील रस्त्यांवर वाहतूक व्यवस्थापनासाठी एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली निर्माण करण्यात येणार आहे.
राज्यात 21 हजार 400 किमीचे रस्ते
राज्यातल्या 36 जिल्हय़ांमध्ये एकूण 21 हजार 400 किमी लांबीचे रस्ते आहेत. या रस्त्यांवर 869 ब्लॅकस्पॉट आहेत. या अपघातप्रवण क्षेत्रातील अपघात कमी करण्यासाठी एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली म्हणजे अपघात कमी करण्यासाठी विविध उपाय योजण्यात येणार आहेत.






























































