पीओपी मूर्तीबंदीला वर्षभरासाठी स्थगिती; केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची घोषणा

866

राज्यभरातील गणेश मुर्तिकारांना गणपती बाप्पा पावला आहे. केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाने यंदापासून पीओपीच्या मूर्तीवर घातलेल्या बंदीला एक वर्षांची स्थगिती देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील मूर्तिकार आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयाची घोषणा केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी ट्विटरद्वारे केली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयानंतर केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाने देशभरातील उत्सवांसाठी सुधारित नियमावली नुकतीच जाहीर केली होती. या नियमावलीनुसार देशभरात पीओपी मूर्तीवर बंदी घालण्यासह अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांची घोषणा प्रदूषण नियामक मंडळाने केली होती. या निर्णयामुळे गणेशोत्सवावर अनिश्चितता पसरली होती. राज्यातील बहुतांश गणेश मुर्तिकारांच्या कामाला डिसेंबरपासूनच सुरुवात होते. त्यामुळे हजारो गणेशमूर्ती बनवून तयार होत्या. त्याचबरोबर इतक्या कमी कालावधीत शाडूच्या मातीच्या मूर्ती बनविणे शक्य नसल्याने राज्यातील अनेक मुर्तिकार संघटना, सार्वजनिक मंडळे आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने यासंदर्भात केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे धाव घेत या निर्णयाची अंमलबजावणी पुढील वर्षांपासून करण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य करीत केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पीओपी मूर्तीबंदीला एका वर्षांची स्थगिती दिली आहे.

यासंदर्भात ट्विट करताना केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नमूद केले की, गणेशमूर्तीसाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी घालण्याच्या निर्णय एका वर्षासाठी स्थगित केला आहे. अनेक मुर्तिकारांच्या मूर्ती बनवून तयार आहेत, त्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील मुर्तिकारांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुर्तीकार आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने या निर्णयाचे स्वागत केले आहे.

या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. यंदा कोरोनामुळे अगोदरच उत्सवावर काही निर्बंध येणार आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी एका वर्षांच्या स्थगितीचा घेतलेला निर्णय चांगला आहे. परंतु पुढच्या वर्षी या निर्णयाची अंमलबजावणी करताना एक बैठक आयोजित करुन त्यात आमची मते ही विचारात घ्यावी. पीओपीमुळे प्रदूषण होते का याचा अभ्यास करायला हवा. सरसकट पीओपीच्या मूर्तीवर बंदी घालू नये.
रेश्मा खातू, मूर्तिकार

आपली प्रतिक्रिया द्या