
सामना ऑनलाईन। रायपुर
छत्तीसगडमध्ये भाजप नेत्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर एका सदस्याने अश्लील व्हिडीओ पोस्ट केल्याने नेते मंडळींची तारांबळ उडाली आहे. या ग्रुपवर पक्षाचे धोरणात्मक निर्णय आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी वरिष्ठ नेते सूचना पाठवत असतात. यामुळे या ग्रुपमध्ये बड्या नेत्यांपासून मीडियाचे कर्मचारीही आहेत. पण काही दिवसांपूर्वी हरीश सिंह या भाजप मंडळच्या अध्यक्षाने ग्रुपवर अश्लील व्हिडीओ पोस्ट केला आणि एकच खळबळ उडाली. हे प्रकरण अंगाशी येत असल्याचे लक्षात आल्यावर सिंह यांनी पोलीस स्टेशन गाठले. माझा मोबाईल हरवला असून दुसऱ्याच व्यक्तीने तो व्हिडीओ पोस्ट केला असावा असे पोलिसांना त्याने सांगितले.
ग्रुपमध्ये अश्लील व्हिडीओ पोस्ट होताच सगळे अवाकच झाले. व्हिडीओ कोणी पोस्ट केला, हे बघण्यासाठी सगळेजण मेसेज बघू लागले. हा व्हिडीओ काही खोडकर नेत्यांनी इतरांनांही फॉरवर्ड केला. त्यातच या ग्रुपमध्ये मीडियाचे प्रतिनिधीही असल्याने त्यांना तर हातात आयतेच कोलीत मिळाले. यामुळे हा व्हिडीओ पोस्ट केलेल्या सिंह यांची पुरती गोची झाली. सगळेजण फोन करुन त्यांची खिल्ली उडवू लागले. तर वरिष्ठ नेत्यांनी याची गंभीर दखल घेतली. यामुळे हादरलेल्या सिंह यांनी पोलिसांकडे मोबाईल हरवल्याची तक्रार करुन या प्रकरणातून अंग काढण्याचा प्रयत्न केला. पण मोबाईल हरवल्याची वेळ आणि व्हिडीओ पोस्ट झाल्याची वेळ यात तफावत आढळल्याने सिंह यांनीच हा व्हिडीओ पोस्ट केला आणि चूक लक्षात आल्यावर मोबाईल हरवल्याचा बनाव केल्याची टीका विरोधकांनी त्यांच्यावर केली आहे.



























































