स्पर्धा परीक्षांसाठी ‘महाज्योती’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
exam_prep
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन, मुंबई

सारथीच्या धर्तीवर ‘महाज्योती’ महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात येणार आहे. याअंतर्गत ज्योतिदूत, जलदूत व सावित्रीदूत असे तीन महत्त्वाचे पथदर्शी कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. इतर मागासवर्ग, सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग आणि विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी महाज्योती संशोधन व प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात येणार आहे. ही संस्था सारथी व बार्टीप्रमाणे विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी एक माध्यम म्हणून काम करणार आहे.

मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाविषयीची माहिती मंत्री डॉ. संजय कुटे यांनी दिली. पावसाळी अधिवेशनात मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी सारथी, बार्टीच्या धर्तीवर स्वतंत्र संस्था स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार एक महिन्याच्या आत 29 जुलै अहवाल सादर करण्यात आला आहे. महाज्योती या संस्थेचे मुख्यालय पुणे येथे तसेच प्रादेशिक कार्यालय बुलढाणा व नागपूर येथे असेल. सन 2019-20 मध्ये खर्च 1324.68 लाख तर 1920-21 साली एकूण 37911.34 लक्ष इतका राहील. महाज्योती संस्थेत कोचिंग व मार्गदर्शन विभाग, मदत व समुपदेशन विभाग, ज्ञानकोश विभाग, मूल्यमापन विभाग, शेती, वनशेती, अवर्षणप्रवण क्षेत्रातील शेती, संशोधन विभाग, नावीन्यपूर्ण प्रकल्प विभाग असे प्रमुख विभाग असतील.