फुटबॉलपटू डिओगा जोटाचा अपघाती मृत्यू

पोर्तुगाल आणि लिव्हरपूल क्लबचा आघाडीच्या फळीत स्टार फुटबॉलपटू डिओगा जोटा याचे गुरुवारी स्पेनमध्ये कार अपघातात निधन झाले. या 28 वर्षीय फुटबॉलपटूच्या अशा दुर्दैवी निधनामुळे अवघ्या फुटबॉल जगतावर शोककळा पसरली.

पोर्तुगाल फुटबॉल फेडरेशनने सोशल मीडियावर डिओगा जोटा व त्याचा भाऊ आंद्रे सिल्वा या दोघांचा कार अपघातात मृत्यू झाल्याची पुष्टी करीत श्रद्धांजली वाहिली. ‘या दोन बंधूंचे असे अपघाती निधन मनाला चटका लावणारे होय. डिओगाचे सर्व सहकारी खेळाडूंसह प्रतिस्पर्धी खेळाडूंनीही या घटनेमुळे तीव्र धक्का बसला आहे.’ डिओगो जोटा याचा जन्म 4 डिसेंबर 1996 मध्ये पोर्तुगालच्या पोर्टो शहरात झाला होता. 2014 मध्ये त्याने पोर्तुगालच्या 19 वर्षांखालील संघात स्थान पटकावले होते. पाच वर्षांनंतर त्याने राष्ट्रीय संघात पदार्पण केले. डिओगोने 49 आंतरराष्ट्रीय सामन्यात 14 गोल केले आहेत.

दहाच दिवसांपूर्वी झाले होते लग्न

जोटा आणि रुटे कार्डोसो यांनी अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 22 जून 2025 रोजी लग्न केले होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी एक फोटो शेअर करून याबद्दल माहिती दिली होती. बुधवारी त्यांच्या पत्नीनेही लग्नाचा व्हिडीओ शेअर केला.