
पालिकेच्या ‘डी’ वॉर्डमध्ये नियंत्रणात असलेला कोरोना गेल्या तीन ते चार दिवसांपासून पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे. यामध्ये चार दिवसांपूर्वी दररोज 30 ते 35 च्या सरासरीने होणारी रुग्णवाढ आता मात्र सरासरी 50 झाली आहे. विशेष म्हणजे ही वाढ मलबार हिल, नेपियन्सी रोड, पेडर रोड, ब्रीचकँडी अशा उच्चभ्रू वस्त्यांमध्ये होत आहे. त्यामुळे पालिकेसमोर ‘डी’ वॉर्ड म्हणजेच ग्रँट रोड परिसरात कोरोना रोखण्याचे आव्हान वाढले आहे.
ग्रँड रोड परिसरात आतापर्यंत एकूण 2205 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून यातील 1500 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे फक्त 602 ऍक्टिव्ह केसेस असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. मात्र सुरुवातीपासून नियंत्रणात असलेल्या ग्रँट रोड परिसरात लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर रुग्णवाढ झाल्याचे समोर आले
आहे. 5 जूनपासून 20 दिवसांत 500 हून जास्त केसेस वाढल्या आहेत. यामध्ये उच्चभ्रू वस्तीमध्ये काम करणाऱया ड्रायव्हर, हाऊसकिपिंग कामगार, सिक्युरिटी गार्ड यांची संख्या 170 आहे. धारावी, मानखुर्दसह परराज्यातून आलेले काही कामगार यात समाविष्ट असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. प्रवास करून येताना या कामगारांना लागण होत आहे. मात्र पॉझिटिव्ह असूनही लक्षणे दिसत नसल्याने संपर्क वाढल्याने प्रसार होत असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. दरम्यान, ग्रँट रोडमध्ये कोरोना रोखण्यासाठी 11 कंटेनमेंट झोन असून 184 इमारती आणि इमारतींचे भाग सील करण्यात आले आहेत. या प्रतिबंधित क्षेत्रात नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहेत.
विभागात पुरेसे बेड उपलब्ध
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रँट रोड परिसरात लक्षणे नसलेले कोरोनाबाधित आणि संशयितांसाठी 20 ‘कोरोना केअर सेंटर -1’ सुरू करण्यात आली असून याची क्षमता एक हजार बेडची आहे. यामध्ये फक्त 400 रुग्ण सध्या असून 600 खाटा रिक्त आहेत. आवश्यकतेनुसार काहीजण होम क्वारेंटाइनही आहेत.
लक्षणे असलेल्या कोरोनाबाधितांसाठी ऑक्सिजन बेड असलेले दोन सुसज्ज क्वारेंटाइन सेंटर असून या ठिकाणी बेड क्षमता 100 आहे. या ठिकाणीही 50 टक्के बेड रिक्त आहेत. त्यामुळे ‘डी’ वॉर्डमध्ये बेडची कमतरता नसल्याचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी सांगितले.
160 सोसायटय़ांसोबत तातडीची बैठक
उच्चभ्रू वस्तीमध्ये कोरोना फैलावत असल्याच्या पार्श्वभूमीवर सोसायट्यांच्या प्रतिनिधींची तातडीची बैठक पालिका प्रशासनाकडून बोलावण्यात आली. यावेळी 160 सोसायटय़ांचे प्रतिनिधी उपस्थित होते, अशी माहिती सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली. यावेळी कोरोना रोखण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, कामगारांसाठी असलेल्या टॉयलेटचे दिवसांतून तीन वेळा निर्जंतुकीकरण करावे असे निर्देश दिल्याचे ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर व्हिजिट केली असता अनेक सोसायटय़ांनी अंमलबजावणीस सुरुवात केल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.

























































