>>किरण सोनवणे
‘कृतज्ञ मी, कृतार्थ मी’ हे प्राचार्य डॉ. बी. जी. वाघ यांचे आत्मचरित्र ‘शब्दमल्हार प्रकाशन’ नाशिक यांनी प्रकाशित केले आहे. शिक्षण क्षेत्रात अव्याहतपणे काम करणाऱ्या अध्यापनशील प्राचार्यांची ही प्रेरणादायी जीवनगाथा आहे. लोकल ते ग्लोबल असा एक व्यापक पट घेऊन आयुष्याची सुविहित मांडामांड करणाऱ्या एका शास्त्रज्ञाची बोध घेण्यासारखी उत्तुंग कथा या ग्रंथात दडली आहे. शिक्षण आणि संशोधनाच्या अवकाशात भेटलेली नक्षत्रांसारखी अनेकविध माणसं कधी अनुभव देतात तर कधी नातं निर्माण करतात. त्या मधूर मधाचा पोळा म्हणजे हे पुस्तक.
कृतज्ञ असल्याशिवाय कृतार्थतेकडे वाटचाल होऊ शकत नाही. ही कृतज्ञता गाव, व्यक्ती, कुटुंब, देश अशा सर्वांबद्दल आहे. नावाला साजेसं कल्पक मुखपृष्ठ आणि संपूर्ण पुस्तकाची आतली मांडणी अतिशय सुबक, साधी आणि आनंददायी आहे. त्याचं श्रेय अनिल वेलजाळी या कल्पक कलाकाराला.
एकूण 305 पानांचं हे पुस्तक चार भागांत विभागलेलं असून त्यात 159 पह्टो आहेत. साध्या, ओघवत्या भाषेतील जिज्ञासा जागवणारं हे पुस्तक पहिल्या पानापासून वाचकाला आपलंसं करून घेतं. जागतिक कीर्तीच्या शास्त्रज्ञाने खेडय़ापाडय़ातल्या नात्यातील मुलांना स्वतःच्या घरी शिक्षणासाठी ठेवून त्यांना उच्च शिक्षित बनवलं. गावच्या शेतीत लक्ष घालून सातत्याने नवनवीन प्रयोग करत उत्पादकता वाढवली. त्यामुळे गावात प्रतिष्ठा मिळाली.
लेखकाने त्याचे वैयक्तिक प्रवासाचे अनुभव खूप सुदररित्या या पुस्तकात रेखाटले आहेत. भौतिकशास्त्र्ाातील संशोधनासाठी परदेशी दीर्घकाळ वास्तव्य, त्यादरम्यान आलेले अनुभव, तिथले मित्र आणि त्यांची कुटुंबे, चालीरीती, खाद्य संस्कृती, प्रेक्षणीय स्थळे यांचं यथार्थ वर्णन या पुस्तकातील लेखांमधून आपल्याला मोहिनी घालतात.
त्यांचे शोधनिबंध आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये वाहवा मिळवतात. जागतिक स्तरावरील प्रतिष्ठत जर्नल्समध्ये प्रकाशित होऊन चर्चेत येतात. दुर्लक्षित, अतिशय लहान खेडय़ात जीवन आणि शिक्षण यांचा श्रीगणेशा करणारा लेखक वीस देशांची भ्रमंती करतो, हे वाचकांना बरंच काही शिकवून जातं. संशोधनक्षेत्रात धडपडणाऱयांना निश्चितच हे प्रेरणादायी आहे.
लेखकाने केलेल्या प्रगतीबरोबर बदलत्या सामाजिक स्थितीचा, ग्रामीण सुधारणांचा इतिहास डोळ्यांसमोर उभा राहतो. शिक्षणाची महती पटवून देण्यात हे पुस्तक 100 टक्के यशस्वी झाले आहे. विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळवून देताना, कॉलेजांचा दर्जा वर नेताना, कॉपी नावाचा पॅन्सर हद्दपार करताना त्यांनी गावकरी, पालक, विद्यार्थी यांच्याशी साधलेला सुसंवाद एका आदर्श प्राचार्यांचा परिचय देतो.
सकारात्मक साच्यातून आकारलेल्या या ग्रंथात जे काही सोसले त्याचे भांडवल करण्याचा अभिनिवेश अजिबात नाही. असामंजस्याची ग्लानी आलेल्या, गोंधळलेल्या तरुणाईसाठी डोळ्यांनी पिऊन डोक्यात उतरत रोमारोमात स्फूर्ती आणणारी संजीवनी म्हणजेच हे पुस्तक असे म्हणावे लागेल.
डॉ. पंडित विद्यासागर, माजी कुलगुरू यांची विस्तृत प्रस्तावना आणि त्यातली वाक्यं, ‘या आत्मकथनात शिक्षणाबरोबर जीवनही त्यांनी चांगल्या प्रकारे रेखाटले आहे.’ आणि ‘हे आत्मकथन सामाजिक विकास प्रक्रियेचे साक्षीदार होऊ शकते.’ पुस्तकातील समाविष्ट माहितीविषयी कल्पना देण्यासाठी पुरेशी आहेत.
पुस्तकाच्या सुरुवातीला आपले मनोगत व्यक्त करताना लेखक म्हणतो, ‘शिक्षण ही माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्ट. त्यामुळे सुरुवातीचा अध्ययनाचा, त्यानंतर अध्यापनाचा व प्रशासनाचा आणि त्यापलीकडे जाऊन संशोधनाचा माझा प्रवास हीच माझी खरे तर जीवन यात्रा. माझे शैक्षणिक स्तरावरचे जीवन आणि कौटुंबिक जीवन हेदेखील इतके समरस झालेले होते की, माझ्या कुटुंबाने मला कधीही त्यापासून दूर जाऊ दिले नाही. मुलांनीही उत्तम शिक्षण घेतले.’ या म्हणण्याचा विस्तार म्हणजे हे पुस्तक. शिक्षण क्षेत्रातील सर्वांनीच हे आत्मचरित्र जरूर वाचावे असे आहे.
कृतज्ञ मी, कृतार्थ मी
लेखक – प्रा. डॉ. बी. जी. वाघ
प्रकाशक – शब्दमल्हार प्रकाशन, नाशिक
पृष्ठ – 305, मूल्य – रुपये 250/-




























































