बांधकाम मंत्र्यांचे आश्वासन खड्ड्यात, 9 सप्टेंबरची डेडलाइन चुकली; चाकरमानी लटकणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

चौपदरीकरणाच्या कामामुळे मुंबई-गोवा महामार्गावर पडलेले सर्व खड्डे 9 सप्टेंबरपूर्वी बुजवण्यात येतील, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले होते, मात्र बांधकाममंत्र्यांनी दिलेली ही डेडलाइन संपली तरी महामार्गावरील खड्डे बुजलेच नाहीत. त्यामुळे बांधकाममंत्र्यांचे आश्वासन अक्षरशः खड्डय़ात गेले आहे. परिणामी यंदा चाकरमानी गावी जाताना पुरते लटकणार आहेत.

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करण्याच्या कामामुळे हा महामार्ग पूर्णपणे उखडला गेला आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी गावी येणाऱया चाकरमान्यांची रखडपट्टी होणार म्हणूनच बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी 31 जुलै रोजी महामार्गाचा पाहणी दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी हे खड्डे तत्काळ बुजवण्याचे आश्वासन दिले होते, मात्र हे आश्वासन हवेतच विरले आहे. सोमवार, 10 सप्टेंबरपासून मुंबईतील चाकरमानी गावी येण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहनांच्या संख्येत कमालीची वाढ होणार आहे. बांधकाममंत्र्यांनी महामार्गाचे चौपदरीकरण करणाऱया कंपन्यांनाच खड्डे भरण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी 8 सप्टेंबरची डेडलाइनही देण्यात आली होती. गेले आठ दिवस पावसानेही विश्रांती घेतली आहे. असे असतानाही महामार्गावरील खड्डे अद्यापही तसेच आहेत. त्यामुळे चाकरमान्यांचा प्रवास या खड्डय़ांतूनच होणार आहे.

अधिकारी जुमानत नाहीत
मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे भरण्याचे आश्वासन बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी ज्या अधिकाऱयांच्या जीवावर जनतेला दिले ते अधिकारीच बांधकाम मंत्र्यांना जुमानत नसल्याचा आरोप रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केला आहे. एसटी बसस्थानकाच्या भूमिपूजनप्रसंगी वायकर रत्नागिरीत आले होते. त्यावेळी त्यांनी हा आरोप केला.

कोंडी होणारच
गणेशोत्सवादरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी महामार्गावरील पनवेल ते सावंतवाडीदरम्यान आजपासून अवजड वाहनांना बंदी करण्यात आली असली तरीही जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱया वाहनांना बंदी काळात परवानगी देण्यात आल्याने या महामार्गावर वाहतूक कोंडी होणारच आहे.