जेईई, नीट परीक्षा – विद्यार्थ्यांना आयआयटीचा मदतीचा हात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जेईई-मेन आणि नीट या परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार आहेत. लॉकडाऊनमुळे सार्कजनिक वाहतूक सेवा सुरळीत झालेली नाही. अशा परिस्थितीत परीक्षा केंद्रावर पोहोचायचे कसे अशा चिंतेत लाखो विद्यार्थी आहेत. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी तर ते अधिकच अडचणीचे आहे. अशा परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी पवई येथील आयआयटी मुंबईने मदतीचा हात दिला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचवण्यास सहकार्य करण्यासाठी आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी एक ऑनलाईन पोर्टल बनवले आहे.

www.eluried.in/ असे हे पोर्टल आहे. या पोर्टलद्वारे आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी तसेच समाजातील इच्छुक मंडळी परीक्षार्थी देशभरातील विद्यार्थ्यांना केंद्रापर्यंत पोहोचवण्यास वाहतुकीची व्यवस्था करू शकतात. मदत हवी असलेल्या विद्यार्थ्यांना त्यासाठी या पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. नोंदणी करताना विद्यार्थी परीक्षा केंद्राची माहिती देऊन वाहतुक व्यवस्थेसाठी विनंती करू शकतील. विद्यार्थ्यांना मदत करू इच्छिणारे माजी विद्यार्थी आणि इतर इच्छुकांनाही या पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. विद्यार्थ्यांना स्वतःच्या वाहनातून परीक्षा केंद्रावर पोहोचवणार की त्यांच्या वाहतुकीसाठी देणगी देणार त्याची माहिती त्यांना द्यावी लागेल. ही मदत विद्यार्थ्यांना त्यांच्या भवितव्यासाठी केलेली ही मदत असणार आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी त्यासाठी पुढे यावे असे आवाहन आयआयटी मुंबईने केले आहे.