पवईच्या आयआयटी मुंबईतील मोकाट गुरांचा ‘हायटेक’ बंदोबस्त

414

कधी वर्गात तर कधी थेट वसतिगृहात घुसणाऱया मोकाट गुरांचा ‘हायटेक’ बंदोबस्त करण्याचा निर्णय पवईच्या आयआयटी मुंबईने घेतला आहे. जीपीएस ट्रकरद्वारे या गुरांवर नजर ठेवली जाणार आहे. तसेच त्यांच्यासाठी गोशाळाही उभारली जाणार आहे.

आयआयटी मुंबईमध्ये शेकडो मोकाट गुरे वावरत असतात. त्यातील एका बैलाने एका विद्यार्थ्याला धडक देऊन जखमी केल्याची घटना गेल्या जुलैमध्ये घडली होती. त्यानंतर वर्गांमध्ये आणि वसतिगृहामध्येही गुरे घुसण्याच्या घटना घडल्या होत्या. या गुरांचे काय करायचे याचा निर्णय घेण्यासाठी आयआयटी मुंबईच्या व्यवस्थापनाने अधिष्ठाता तपनेंदू कुंडू यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती स्थापन केली होती. त्या समितीने जीपीएस ट्रकर आणि गोशाळेचा उपाय सुचवला आहे.

आयआयटी मुंबईच्या ‘इनसाइट’ या ऑनलाइन नियतकालिकात हे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. कुंडू समितीने आयआयटीच्या परिसरातील सर्व मोकाट गुरांचे सर्वेक्षण करून त्यांची बोटहाऊसजवळील गोशाळेत व्यवस्था करण्यात यावी असे सुचवले आहे. वसतिगृह क्रमांक 8 मागील परिसरात मोकाट गुरांना पाणी आणि खाद्य पुरवावे असे समितीने म्हटले आहे.

गोशाळेतून मिळणाऱया दूध, गोमूत्राचाही वापर करणार
संस्थेच्या निधीतूनच कायमस्वरूपी गोशाळा उभारली जावी असे समितीचे मत आहे. गोशाळेतील गाईंपासून मिळणारे दूध आयआयटीतच वापरले जावे, गोमूत्राची विक्री आयुर्वेदिक औषधे बनवणाऱया कंपन्यांना करावी आणि शेणाचा वापर बायोगॅस निर्मितीसाठी करावा अशा शिफारशीही समितीने केल्या आहेत. गोशाळेची गुरांना सवय होईपर्यंत तिथे केअरटेकर नेमावा असेही समितीने म्हटले आहे.

गुरांना ट्रॅक करण्यासाठी टॅग लावणार
मोकाट गुरांना टॅग लावून जीपीएस ट्रॅकरद्वारे त्यांच्यावर नजर ठेवावी. जीपीएस ट्रॅकरमुळे गुरांच्या हालचाली समजतील आणि सुरक्षा रक्षक त्यांना आयआयटीतील इमारतींमध्ये घुसण्यापासून दूर करू शकतील असे कुंडू समितीने सुचवले आहे. परंतु अद्याप त्यावर अंतिम निर्णय होणे बाकी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या