भरमसाठ वीजबिलामुळे पलावातील रहिवाशी होरपळले! स्मार्ट मीटर्समुळे ग्राहकांना शाॅक

डोंबिवलीमधील पलावा टाऊनशिपमधील रहिवाशांना सध्या एका तापदायक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. येथील 300 हून अधिक रहिवाशांना, गेल्या अनेक महिन्यांपासून मासिक भाड्यापेक्षा जास्त वीजबिल येत आहे. या बिलाची रक्कम त्यांच्या फ्लॅटसाठी भरलेल्या गृहकर्जाच्या हप्त्यापेक्षा जास्त आहे.

मार्चपूर्वी ज्यांना 2 बीएचके फ्लॅटसाठी दरमहा 2000 ते 2500 रुपये वीज देय होती. त्यांना आता गेल्या चार महिन्यांपासून 15 हजार ते 30 हजारापर्यंतची बिले येत आहेत. टाइम्स अाॅफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून, एका रहिवाशाला त्याचे 20 हजार रुपयांचे थकित बिल भरण्यासाठी वैयक्तिक कर्ज घ्यावे लागले आहे.

रहिवाशांचा आरोप आहे की, जुन्या मीटरचे स्मार्ट मीटरमध्ये बदल केल्यामुळे हे घडले आहे. महावितरणच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मीटर रीडिंग गोळा करणाऱ्या व्यक्तीची अनुपलब्धता हे त्याचे कारण आहे. “ती व्यक्ती ड्युटीवर हजर झालेली नाही, त्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून प्रत्यक्ष मीटर रीडिंग घेतले गेले नाही. आम्ही बदली व्यक्ती शोधत आहोत, परंतु तोपर्यंत सरासरी रीडिंग दिले जात आहे,” असे एका रहिवाशाने संपर्क साधला असता महावितरणच्या अधिकाऱ्याने सांगितले.

महावितरणचे अधिकारी उन्हाळ्यात जास्त वीज वापरामुळे काही मीटर रीडिंग खरे असल्याचा दावा करतात, तर वीज झटक्याने त्रस्त रहिवाशांनी सांगितले की ते सलग आठ महिन्यांपासून त्रास सहन करत आहेत.