
>> प्रभाकर पवार
पंजाबी गायक शुभदीप सिंह ऊर्फ सिद्धू मुसेवाला याची (पोलीस संरक्षण असताना) गोळ्या घालून हत्या करणारा लॉरेन्स बिष्णोईचा धाकटा भाऊ अनमोल बिष्णोई (26) यास राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणांनी (NIA) गेल्या महिन्यात अमेरिकेकडून ताब्यात घेतले. अनमोल याला दिल्लीच्या तिहार जेलमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहे. अनमोलविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी आदी 20 च्या वर गुन्ह्यांची देशभरात नोंद आहे. अनमोल हा बनावट पासपोर्टवर अमेरिकेच्या वेगवेगळ्या शहरांत राहत होता. राष्ट्रीय तपास यंत्रणांनी हिंदुस्थानात पकडलेल्या आरोपींच्या माहितीच्या आधारावर त्याला अमेरिकेत ‘लोकेट’ केले व तेथील तपास यंत्रणांना माहिती दिली. अनमोलची अमेरिकन पोलिसांनी इमिग्रेशनची कागदपत्रे तपासली असता त्याचा पासपोर्ट बनावट नावाने असल्याचे उघड झाले. अशा ‘फर्जी’ आरोपीला अमेरिकेने हिंदुस्थानच्या ताब्यात दिले, परंतु वर्षभर आता अनमोल तिहार तुरुंगाच्या चार भिंतीत राहणार आहे. देशातील कोणत्याही पोलीस किंवा तपास यंत्रणांना त्याचा ताबा देण्यात येणार नाही. ज्या तपास यंत्रणांना अनमोलची कोठडी हवी आहे, त्यांना ती मिळणार नाही. तपास यंत्रणांनी परवानगी घेऊन तिहार जेलमध्ये जाऊन (दाखल गुन्ह्यांबाबत) चौकशी करावी असे फर्मान केंद्रीय गृहमंत्रालयाने (Ministry of Home Affairs) जारी केले आहे. त्यामुळे अनमोल बिष्णोई आता तिहार जेलमध्ये सुखेनैव राहणार आहे. अनमोल हा तांत्रिक बाबतीत एक्सपर्ट आहे. तुरुंगात बसून तो अंडरवर्ल्डची सूत्रे हलविणार आहे व हवा त्याचा तो काटा काढणार आहे. साबरमती जेलमध्ये त्याचा भाऊ लॉरेन्स सध्या तेच करतो आहे.
अनमोल हा तिहार, तर त्याचा मोठा भाऊ लेरिन्स हा गुजरातच्या अहमदाबादमधील साबरमती कारागृहात गेल्या वर्षभरापासून आहे. त्यालाही त्या जेलमध्ये स्वतंत्र ‘सेल’ उपलब्ध करून देण्यात आला असून त्यालाही जेलमध्ये शाही वागणूक देण्यात येते. मुंबईचा अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला 2015 साली इंडोनेशियाने भारतात डिपोर्ट केले तेव्हापासून तोही तिहार जेलमध्ये असून त्यालाही मुंबई क्राईम बॅचच्या ताब्यात देण्यात आलेले नाही किंवा त्याची कोणतीही सखोल चौकशी केली गेलेली नाही. त्याने देशासाठी किती त्याग केला आहे माहीत नाही. परंतु जेडेसारख्या मुंबईच्या ज्येष्ठ पत्रकाराला ठार मारण्यासाठी त्याने जो कट रचला तेव्हापासून त्याचा वाईट काळ (Bad Patch) सुरू झाला.
त्याला अनेक व्याधी झाल्या. छोटा राजनविरुद्ध 99 टक्के गुन्हे मुंबईत दाखल आहेत तरीही सुरक्षेचे कारण सांगून छोटा राजनला मुंबई क्राईम ब्रँचच्या ताब्यात देण्यात आलेले नाही. छोटा राजन खरा बोलला तर सत्ताधाऱ्यांचेच पितळ उघड होईल असे बोलले जाते.
मुंबईतील जे. जे. हत्याकांडातील प्रमुख आरोपी सुभाषसिंग ठाकूर यास मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलिसांच्या क्राईम बँचने विरारमधील बिल्डर समय चौहान यांच्या हत्येप्रकरणी नुकतेच ताब्यात घेतले आहे. हा गुंडही उत्तर प्रदेशातील फत्तेहगड सेंट्रल जेलमध्ये गेल्या दोन दशकांपासून आहे व तेथे तो जनता दरबार भरवतो. दाऊद टोळीतून बाहेर पडून सुभाषसिंग ठाकूर याने स्वतःची टोळी स्थापन केली आहे. मीरा-भाईंदरपासून अगदी पालघर पट्टद्यापर्यंत या यूपीच्या गुंडांची दहशत आहे. अशा गुंडांना सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा असल्याने त्यांना जेलमध्ये हवे ते मिळते. जेलमध्ये गुंड पोसले तर ते निवडणुकीला कामाला येतात हे लपून राहिलेले नाही.
सिने अभिनेता रणवीर सिंग व अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘धुरंधर’ या चित्रपटात अक्षय खन्नाने रहेमान डकैत या पाकिस्तानातील अत्यंत शक्तिशाली गैंगस्टरची भूमिका बजावलेली आहे. अशा या खतरनाक गँगमध्ये रणवीर सिंग हा राँचा हेर हमजा अली मिजारी नावाने सामील होतो व त्याचे साम्राज्य उद्ध्वस्त करतो. भारतीय गुप्तचर यंत्रणा हमजाला हेर म्हणून पाठवते व हे काम करून घेते असे या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. देशाच्या सुरक्षेसाठी RAW अशी कामे पाकिस्तानात करून घेते. त्यासाठी संघटित टोळ्यांचा वापर केला जातो. दाऊदला मारण्यासाठी छोटा राजनची गैंग पाकिस्तानात दोन दशकांपूर्वी रणवीर सिंग उर्फ हमजाला पाकिस्तानात पाठविणाऱ्या गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यानेच घुसवली होती, परंतु छोटा राजन टोळीचा तो प्रयत्न फसला. आता दाऊद व छोटा शकील पाकिस्तानात सक्रिय नाहीत. ते जिवंत आहेत की नाहीत, यावरही कुणी बोलत नाही. लॉरेन्स बिष्णोई, अनमोल बिष्णोई, छोटा राजनसारख्या बड्या गुंडांना न्यायालयात हजर केले जात नाही. कुठल्याही पोलीस एजन्सीच्या ताब्यात दिले जात नाही. याला सुरक्षेचे जरी कारण सांगितले जात असले तरी त्यामागची कारणे वेगळी आहेत. जे बाहेर राहून करता येत नाही ते त्यांना जेलमध्ये राहून बिनधास्त करता येते. सत्ताधाऱ्यांना तेच हवे आहे. जेलमध्ये काही काळ राहून साक्षीदारांना फोडून आपल्या विरुद्धच्या केसेस कोर्टाकडून संपविल्या जातात. जेलमधून बाहेर आल्यावर निवडणुकीला उभे राहता येते. आमदार होता येते. अरुण गवळीने तेच केले. तो आमदार झाला. जे. जे. हत्याकांडातील काही आरोपी उत्तर प्रदेशात आमदार झाले. उद्या बिष्णोई बंधू झाले तर कुणी आश्चर्य वाटून घेऊ नये. जेलमध्ये संघटित गुंडांचे साम्राज्य थरकाप उडविणारे असते. जेलरही अशा गुंडांच्या वाटेला जात नाहीत. गरीब कैद्यांना तर जेलमध्ये कुणी वालीच नसतो. भटक्या कुत्र्यांप्रमाणे त्यांची दयनीय अवस्था असते.
































































