
सामना ऑनलाईन । मुंबई
प्रबोधन क्रीडा भवन, गोरेगाव आयोजित आंतर शालेय क्रीडा महोत्सव या वर्षी 5 ते 8 डिसेंबर या कालावधीदरम्यान संपन्न होणार आहे. यंदाचे हे 41 वे वर्ष असून यावेळी या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते बुधवार, 5 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता होणार आहे.
या कार्यक्रमाला मुंबईचे पालकमंत्री व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई हे प्रमुख अतिथी असणार आहेत. पश्चिम उपनगरामधील वांद्रे ते दहिसरपर्यंतच्या बहुतांश शाळा यात सहभागी होत असतात हा या महोत्सवाच्या चार दशकांचा इतिहास आहे. सर्वसाधारणपणे 200 पेक्षा अधिक शाळांतील सुमारे सात हजार स्पर्धकांचा यात सहभाग असतो.
या महोत्सवामध्ये अॅथलेटिक्स आणि जलतरण या खेळांकडे जास्त ओढा दिसत असला तरी अस्सल हिंदुस्थानी समजल्या जाणाऱया व मराठी मातीमध्ये घट्ट पाळेमुळे असणाऱया कबड्डी, खो-खो आणि मल्लखांब या खेळांमधील स्पर्धादेखील तीव्र असल्याचे पाहावयास मिळते. याशिवाय बुद्धिबळ, टेनिस आणि कराटे या खेळांमध्येही बऱयापैकी स्पर्धक उतरतात. तिरंदाजीसारखा ग्रामीण खेळही येथे पाय रोवताना पाहावयास मिळतो. त्यामधील स्पर्धकांचे प्रमाण वर्षागणिक वाढते आहे. विविध स्पर्धा प्रकारांमध्ये पारितोषिके आणि पुरस्कार या महोत्सवामध्ये दिले जातात. शिवाय प्रत्येक खेळांमध्ये अधिक गुणकमाई करणाऱया शाळांना सांघिक पुरस्कार बहाल केले जातात. महोत्सवामध्ये एकत्रितरीत्या अव्वल ठरणाऱया शाळेला ‘प्रबोधन ग्रॅण्ड ट्रॉफी’चा बहुमान देण्यात येणार आहे.





























































