प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाची झेप, ‘मल्लखांब कट्टा’मध्ये अरविंद प्रभू यांनी उलगडले यशाचे रहस्य

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती, प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाने गेल्या काही वर्षांमध्ये उत्तुंग झेप घेतली आहे. या क्रीडा संकुलाच्या यशाचे रहस्य अध्यक्ष अरविंद प्रभू यांनी श्री पार्लेश्वर व्यायाम शाळा युटय़ूब चॅनेलवरील ‘मल्लखांब कट्टा’ या सत्रादरम्यान उलगडले.

अरविंद प्रभू यावेळी म्हणाले की, माझे वडील डॉ. रमेश प्रभू यांच्या संकल्पनेतून या क्रीडा संकुलात ऑलिम्पिक आकाराचे जलतरण तलाव तयार झाले. या जलतरण तलावात गेल्या काही वर्षांमध्ये असंख्य खेळाडूंनी प्रशिक्षण घेतले. तसेच या क्रीडा संकुलातील खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

कमी पैशांमध्ये जास्त सुविधा

अरविंद प्रभू यांनी यावेळी पुढे सांगितले की, आजही आम्ही या क्रीडा संकुलात खेळाडूंना कमीतकमी पैशांमध्ये जास्तीतजास्त सुविधा देण्याचा प्रयत्न करतो. आता आम्हाला या क्रीडा संकुलात क्रीडा वाचनालय सुरू करायचे आहे. आम्ही एक वर्ग बनवलाय. त्यामध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. क्रीडा संकुलातील युवक संगणकाद्वारे खेळाची माहिती मिळवू शकतील, असेही त्यांनी नमूद केले. या सत्राचे सूत्रसंचालन श्री पार्लेश्वर व्यायामशाळेचे प्रशिक्षक गणेश देवरूखकर यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या