पर्यावरणाचा ध्यास, हाच तिचा श्वास…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अश्विन बापट

काही जण पर्यावरण रक्षणाचा ध्यास घेतात आणि त्यांचा हा ध्यासच त्यांचे जगणे बनतो. असाच निसर्गप्रेम जपण्याचा आणि निकोप पर्यावरणाचा वसा घेतलेली विशीतली तरुणी प्राची शेवगावकर.

वातावरणातले कार्बन उत्सर्जन कमी करणे या एकमेव ध्येयाने झपाटलेली, ‘कूल द ग्लोब’ (cool the globe) अॅपच्या माध्यमातून तिने टाकलेले पाऊल आज विश्वव्यापी झालेय. ज्याची सुरुवात खरे तर तिच्या शाळेतून झाली.

अक्षरनंदन ही अत्यंत वेगळय़ा वाटेने शिक्षण देणारी प्राचीची शाळा. एकदा त्यांना लिखाणासाठी विषय देण्यात आला, 10 वर्षांनंतरच्या स्वतःला पत्र लिहा. प्राचीने ते लिहिले. कालौघात ते विस्मृतीत गेले. पुढे 10 वर्षांनी शाळेतल्या शिक्षकांनी हे पत्र तिला पाठवत त्याची आठवण करून दिली. प्राचीने भूतकाळातल्या पत्रात आणि भविष्याच्या वाटेवर डोकावून पाहिले, त्यावर विचार केला. क्लायमेट चेंजबद्दल तिने तोपर्यंत बरेच काही वाचलेले, पण या अत्यंत ज्वलंत विषयासाठी आपण काय योगदान देऊ शकतो या विचाराने ती अस्वस्थ झाली. त्याच वेळी ज्ञानेश्वर बोडकेंसारखे प्रयोगशील शेतकरी मार्गदर्शक म्हणून लाभले. कचरा वेचणाऱया हजारो जणांचे आयुष्य बदलून टाकणाऱया ‘हसरू दला’सारख्या संघटनेच्या कार्याशी तिची गाठ पडली. जिचे मोठे काम बंगळुरूत आहे.

टीनएजमध्ये प्राची गरिबी, वातावरणीय बदलांसारख्या सामाजिक प्रश्नांकडे गांभीर्याने पाहू लागली. त्याच वेळी घरी केवळ दोन तासच पाणी येत असल्याने शाळेवर पाणी सोडणारी लेकरे तिला भेटली. कचरा वेचणाऱयांच्या कथा ऐकून ती अंतर्मुख झाली. तेव्हाच तिने ठरवले समाजासाठी काहीतरी योगदान द्यायचे. युवा पिढीची प्रतिनिधी असल्याने तंत्राशी मैत्री होतीच. तेव्हा तिला क्लिक झाले एक अॅप बनवूया. यातूनच जन्म घेतला ‘कूल द ग्लोब’ या अॅपने.

2017 पासून अॅप बनवायला सुरुवात केली. 2020 ला ते सुरू झाले आणि आता 2023 मध्ये या अॅपचे 45 हजार जागतिक पातळीवरचे युझर्स आहेत, तर 110 देशांमध्ये हे तिचे अॅप पोहोचले आहे. या अॅपमध्ये प्रत्येक महिन्याचे टार्गेट देण्यात येते आणि कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी पावले टाकली जातात.

प्राचीच्या या मिशनची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली आहे. म्हणूनच या वर्षभरात ती व्हिएतनाम, पोर्तुगाल, अमेरिका, यूके, आयर्लंड, लंडन, थायलंड अशी जगभ्रमंती करणार आहे. हिंदुस्थानची प्रतिनिधी म्हणून या देशांमध्ये होणाऱया विविध परिषदा, चर्चासत्रांमध्ये ती सहभागी होणार आहे. ध्येय एकच वातावरण बदलाचा अभ्यास करणे, कार्बन उत्सर्जन रोखणे, पर्यावरण जोपासणे. यातला तिचा व्हिएतनाम दौरा पार पडलाय. काहीच दिवसांत ती अमेरिकेत बिल आणि मेलिंडा गेट्स यांच्या गेट्स फाऊंडेशनमध्ये या विषयावर संवाद साधणार आहे.

सोशल मीडियाच्या जमान्यात विशीतल्या रील स्टार्स चर्चेतल्या विषय ठरत असतातच. त्याच वेळी निसर्गाची होणारी हानी रोखण्याचे मिशन हाती घेणारी प्राचीसारखी रीअल स्टार आयुष्यावर वेगळा ठसा उमटवतेय अन् आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या मनातही अशीच समाजभान जपण्याच्या पालवीची रुजवात करतेय.

आधी केले मग सांगितले

प्राचीने याची सुरुवात स्वतःपासून केली. मग सोलर हीटर बसवून 14 किलो कार्बन उत्सर्जन रोखले. महिन्यातील तीन दिवस सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करून दोन किलो, प्लॅस्टिक रीसायकलिंग करून 4 किलो आणि ओला कचरा-सुका कचरा वर्गीकरण करून एक किलो कार्बन उत्सर्जन रोखले. एसीचा कमी वापर करणे, सोलर पॅनल बसवणे असे छोटे छोटे सोपे उपाय करून आपण तापमान वाढ किंवा प्रदूषणासारख्या समस्येवर संघटित प्रयत्नांनी मार्ग काढू शकतो हे तिने लोकांच्या मनावर ठसवले.

(लेखक एबीपी माझाचे सीनिअर प्रोडय़ूसर-सीनिअर न्यूज अँकर आहेत.)