
नांदिवडे गावचे ग्रामस्थ जिंदाल कंपनीच्या गॅस टर्मिनल विरोधात अनेक दिवस लढा देत आहेत. गेल्या महिन्यात जयगड येथे झालेल्या बैठकीत जिंदाल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आपल्याकडे ना-हरकत दाखला मिळाल्याचे सांगितले होते.पण त्या ना-हरकत दाखल्याची चौकशी केली असता त्या ना-हरकत दाखल्यावर जावक क्रमांक नाही, ठराव दिनांक नाही आणि त्याचा दफ्तरात कुठेही नोंद नसल्याचा खळबळजनक आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष ॲड.स्वप्नील पाटील यांनी केला आहे.त्यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत बोगस ना-हरकत दाखल्याच्या चौकशीची मागणी केली आहे.
ॲड.स्वप्नील पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात 9 जून 2006 रोजीचा कथित ना-हरकत दाखला जे.एस.डब्ल्यू. एनर्जी आणि जेएसडब्ल्यू ब्राम्ही बंदर यांच्यासाठी दाखवण्यात येत आहे.मात्र या ना-हरकत दाखल्याची कोणतीही अधिकृत नोंद सापडली नसल्याची तक्रार ॲड.पाटील यांनी केली आहे.हा दाखला बोगस असल्याचा संशय त्याने दाखवला आहे. संबंधित ना-हरकत दाखल्याची सखोल चौकशी करा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.हे प्रमाणपत्र खोटे आढळल्यास त्यांच्या कायदेशीर कारवाई करा,गॅस टर्मिनल तात्काळ स्थलांतरित करावा,जिंदाल कंपनीने स्थानिक ग्रामस्थांचे शेती,मच्छिमारी आणि फळबाग यांची नुकसानभरपाई द्यावी.चौकशीचा संपूर्ण अहवाल 15 दिवसात आम्हाला द्यावा अशी मागणी ॲड.स्वप्नील पाटील यांनी केली आहे.