भाजप नगराध्यक्षांच्या कराड नगरपालिकेतील केबिनला ठोकले टाळे

317

कराड नगरपालिकेमध्ये भाजपच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्या नगरपालिकेतील केबिनला प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी टाळे ठोकले. भाजपच्या नगराध्यक्षांना कराड शहरातील समस्यांची सोडवणूक करण्यात स्वारस्य नसेल तर त्यांनी राजीनामा देऊन पक्षाचे काम करावे, असा इशारा प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

नगराध्यक्षा जनतेच्या कामांना महत्त्व देत नाहीत, असा आक्षेप घेत प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्या येथील केबिनला टाळे ठोकले. त्यांना लोकांसाठी वेळ नसेल तर त्यांनी राजीनामा देऊन घरी बसावे असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला होता. मंगळवारी सकाळी प्रहार संघटनेचे कार्यकर्ते नगराध्यक्षांना निवेदन देण्यासाठी नगरपालिकेत आले होते. त्यावेळी नगराध्यक्ष पालिकेत नव्हत्या. त्या भाजपच्या कार्यक्रमाला गेल्या असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्याकडून लवकर येण्याबाबत टाळाटाळ होत असल्याने कार्यकर्त्ये संतप्त झाले होते. प्रहार संघटनेच्यावतीने, शहरातील विविध भागांतील तसेच वाखान परिसरातील महत्वाच्या समस्या सोडवण्यात याव्यात, यासाठी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन देण्यासाठी प्रहार संघटनेचे कार्यकर्ते येथील सकाळी 11 वाजणेचे सुमारास आले होते. भाजपाच्यावतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी नगराध्यक्षा गेल्या होत्या.

आंदोलनात सहभागी होण्यासाठी नगराध्यक्षा सकाळपासून भाजपच्या कार्यक्रमात व्यस्त होत्या. संतप्त झालेल्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी 11 ते 1 वाजेपर्यंत प्रतीक्षा केली. मात्र, नगराध्यक्ष आल्याच नाहीत. यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी अखेर कुलूप आणून नगराध्यक्षांच्या केबिनला लावले.

आपली प्रतिक्रिया द्या