नुकसानग्रस्तांना पहिल्या टप्प्यातील मदत लवकरच – प्राजक्त तनपुरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाळ्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. निकषांपेक्षा जास्त मदत देण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र, नुकसानग्रस्तांना तत्काळ दिलासा मिळावा, यासाठी निकषानुसार मदतीचा पहिला टप्पा वर्ग करण्याबाबत मंत्रिमंडळात चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून लवकरच पहिल्या टप्प्याची मदत करण्याचे आदेश दिले जातील, अशी माहिती मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली. नगरच्या शासकीय विश्रामगृहावर अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यमंत्री तनपुरे म्हणाले, मध्यंतरीच्या काळामध्ये विजेसाठी कोळशाचा तुटवडा होता. यासंदर्भात मंत्री नितीन राऊत व आम्ही तत्काळ बैठक घेतलेली आहे. पाऊस जास्त झाल्यामुळे काही प्रमाणात अडचणी आल्या. विजेचा वापर वाढला होता. ऑगस्ट महिन्यामध्ये सरासरीइतका पाऊस पडला नव्हता. त्यामुळे विजेची मागणी मोठय़ा प्रमाणात होती. या सर्व बाबींचा विचार केल्यानंतर अडचणी दूर करण्याच्या सूचना यंत्रणांना दिल्या आहेत. त्यामुळे राज्यामध्ये भारनियमन होणार नाही, याची दक्षता घेण्याचेही आदेश दिले आहेत.

वीज बिलाच्या थकबाकीची वसुली करण्याचे आदेश दिले होते. त्याचवेळी सरकारकडून कृषी ऊर्जा धोरण निश्चित केले होते. याठिकाणी वसुली झाल्यानंतर 33 टक्के रक्कम त्याच गावात, तर 33 टक्के रक्कम जिल्ह्यातील ऊर्जा विभागाच्या प्रलंबित कामांकरिता वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी राज्यामध्ये चांगल्याप्रकारे सुरू आहे. नगर जिह्यातील वसुलीनुसार गावपातळीवर 10 सबस्टेशन उभारण्याचा व क्षमता वाढविण्याचा निर्णय घेतल्याचेही राज्यमंत्री तनपुरे यांनी सांगितले.

कर्डिलेंना धक्का; कट्टर समर्थक राष्ट्रवादीत
राहुरी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे कट्टर समर्थक भाजपचे नगरसेवक शहाजी जाधव (ठाकूर) यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यापाठोपाठ राहुरी मतदारसंघातील धनगरवाडीचे (ता. नगर) सरपंच किशोर शिकारे यांनी चार ग्रामपंचायत सदस्यांसह भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कर्डिलेंना दिलेला धक्का मानला जात आहे.