भाजपच्या दादागिरीला घाबरत नाही – प्रकाश आंबेडकर

1667

अमेरिकेच्या कापसाच्या बोटी गुजरातच्या बंदरात लागल्या. त्यामुळे कापसाचा भाव चार हजार रुपये प्रतिक्विंटलवर आला. अजून 25 बोटी येणार आहेत. त्यामुळे कापूस उत्पादक अधिकच संकटात आहे. नरेंद्र मोदींनी ट्रम्पला टाळी दिली आणि त्याची किंमत आपल्या शेतकर्‍यांना मोजावी लागत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी बुलढाण्यातील जाहीर सभेत केला. त्याबरोबरच आम्ही ईडीला घाबरत नाही, किंवा भाजपच्या दादागिरीलाही घाबरत नाही, असे म्हणून भाजपवर त्यांनी निशाणा साधला.

बुलढाणा येथे शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यावेळी विजयराज शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. 2014 पासून 2019 पर्यंत दोन लाख कारखाने बंद झाल्याचे स्पष्ट करून प्रकाश आंबेडकर म्हणाले की, प्रत्येक कारखान्यामध्ये चार जरी कामगार पकडले तरी आठ लाख कामगार बरोजगार झाले आहेत. त्यांना अगोदर काम द्या आणि मग एक कोटी नव्या नोकर्‍या निर्माण करा. पोलिसांची ड्युटी 12 तासावरून आठ तास करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. त्यासाठी रोजगार हमी योजना सुरू केली. पूर्वी या रोहयोतून अनेक कामे निघत होती. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळत होते. परंतु आज अत्यंत कमी कामे निघत आहेत. 22 हजार कोटी कर दरवर्षी गोळा करण्यात येते. हा कर रस्त्याच्या कामासाठी वापरल्या जातो. परंतु हा कर बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी वापरणे आवश्यक आहे. हे शासन त्याचा योग्य वापर करत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

विदर्भात सर्वाधिक क्षेत्र हे कापसाचे आहे. परंतू आज कापसाचे भाव पडल्याने शेतकरी संकटात आहे. कापसाचा हमीभाव 5 हजार 500 रुपये प्रतिक्विंटल आहे. परंतू कापसाला चार हजारापर्यंतच भाव मिळत आहे. कापसाचे भाव का पडले? हे काँग्रेस किंवा शिवसेना – भाजपचा कुठलाच उमेदवार सांगू शकत नाही; कारण ते ईडीला घाबरतात, असा टोलाही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी लगावला. यावेळी विजयराज शिंदे यांनी आपले विचार मांडले.

आपली प्रतिक्रिया द्या