प्रत्येकाने समाजात आपली जबाबदारी ओळखुन कार्य केले पाहीजे – डॉ. प्रकाश आमटे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सहिष्णुता ही हिंदुस्थानी संस्कृतीची ओळख असताना आपल्याच माणसांना बेघर, बेसहाय रस्त्यावर सोडणे, हे सुसंस्कुतपणाचे लक्षण नसून प्रत्येकाने समाजात आपली जबाबदारी ओळखून कार्य केले पाहीजे, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी केले. सोमवारी पळसखेड सपकाळ ता. चिखली येथील सेवा संकल्पच्या सातव्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर डॉ. मंदाताई आमटे, स्वामी हरिचैतन्यानंद सरस्वती महाराज व रामायणाचार्य हभप संजय महाराज पाचपोर यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते विविध दानशूरांच्या पुढाकारने बांधून पूर्ण झालेल्या अन्नपुर्णा कक्ष, भोजन कक्ष, गोशाळा, रूग्णकक्ष, शस्रक्रीया कक्ष, स्वच्छता गृह या वास्तूंचे यावेळी उद्घाटन करण्यात आले.

जेष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ प्रकाश आमटे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, डॉ. नंदकुमार पालवे व आरती पालवे यांनी पळसखेड सपकाळ येथे बेघर बेसहाय, अनाथ, अपंग मनोरूग्णांसाठी सुरू केलेल्या सेवा संकल्पच्या कार्यात मला कारूण्याची अनुभूती येते. बाबा आमटे यांचे उदाहरण देत बाबांना रस्त्याच्या कडेला पडलेला कुष्ठरुग्ण दिसला व त्यांच्या मनात त्या रुग्णाविषयी करूणा जागृत झाली व त्याच करूणेतुन पुढे या कुष्ठरुग्णांसाठी आनंदवन उभे राहले. बाबांच्या मनात जशी करूणा होती तशीच करूणा पालवे दाम्पत्यांच्या मनात या बेघर, बेसहाय मनोरुग्णासाठी आपल्याला पहायला मिळाली. त्यांनी आदिवासींसोबत काम करतांनाचे काही अनुभव श्रोत्यांना सांगितले. सेवाकार्य करतांना तक्रार न करता परिस्थितीशी जुळवून घेणे व संख्यात्मकतेपेक्षा गुणात्मकतेवर भर देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. सात वर्षापुर्वी माझ्या हातून सुरू झालेल्या या सेवाकार्याची आज दृढनिश्चयाने भक्कमपणे घोडदौड पाहून आपल्याला समाधान झाल्याचे त्यांनी सांगितले. आज कुटुंबातील सदस्यांची घरातील जेष्ठाप्रती भावना बदलेल्या असून थकलेल्या आई वडिलांना रस्त्यावर सोडणार्‍या मुलांच्या संख्येत वाढ होत असल्याने सेवासंकल्पातील बेघर तसेच मनोरुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ही झालेली वाढ म्हणजे मनात असलेल्या करुणेचा अभाव आहे. ही झालेली वाढ हे दुर्दैवच असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

स्वामी हरिचैतन्य महाराज यांनी आपल्या परिसरात होत असलेले हे सेवाकार्य आनंदाची बाब असल्याचे सांगून, समाजाच्या समान सेवेची संधी म्हणजेच सेवासंकल्प परीवार असून समाजाच्या मानसिकतेत बदल होण्याची गरज व्यक्त केली. नंदु व आरतीच्या मागे सदैव आपले आशिर्वाद असल्याचे ते म्हणाले. रामायणाचार्य हभप संजय महाराज पाचपोर म्हणाले की, शब्दाने मिळालेली प्रसिध्दी फार काळ टिकत नाही पण कर्तृत्वाने मिळालेली प्रसिध्दी फार काळ टिकते. त्यामुळे समाजाप्रती काही देणे लागते ही भावना जोपासली पाहिजे असे मत पाचपोर यांनी व्यक्त केले. याप्रसंगी सेवा संकल्प परिवाराला मदत करणारे दानशूर नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

यावेळी बुलढाणा जिल्हा पोलीस अधिक्षक दिलीप पाटील भुजबळ, सतिष गुप्त, पत्रकार राजेंद्र काळे, पत्रकार अरूण जैन, प्रा. अनंत सिरसाट, प्रा. सुनिल देशमुख, प्रविण गिते, जिल्हा शल्य चिकित्सक विजय निकाळे यांचेसह परिसरातील सामाजीक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरवातीस निशिकांत ढवळे व वंदना ढवळे लिखीत सेवासंकल्पवरील ओसाड गावचे रहिवाशी या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न झाले. चिखली अर्बन बँक परिवाराने देखील येथे सेवा संकल्पच्या सातव्या वर्धापन दिनी स्वर्गीय भगवानदास गुप्त यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्वच्छता गृह बांधून दिले आहेत. त्यांचे उद्धाटन पद्मश्री प्रकाश आमटे, रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर यांच्या हस्ते करण्यात आले.

या सेवाकार्यात चिखली अर्बन बँके परिवाराने आपला खारीचा वाटा उचलला आहे, आपण सर्वांनी देखील आपआपल्या परीने सेवा संकल्प परिवारास मदत करावी असे आवाहन चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांनी केले आहे. तसेच सतीश गुप्त यांनी आपला वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचा संकल्प केला होता. कोणतीही भेटवस्तू हार-तुरे न स्वीकारता पळखेड येथे मनोरुणाच्या सेवेसाठी सुरू असलेल्या सेवासंकल्प प्रकल्पास रामायणाचार्य संजय महाराज पचपोर यांच्या मार्गदर्शनातून प्रेरणा घेऊन हार, गुच्छ, भेट वस्तू न आणता सेवासंकल्प कलशामध्ये मध्ये रोख मदती विनंती आपल्या मित्र परिवार व स्नेही जणांना केली होती. या विनंतीला प्रचंड प्रतिसाद सर्व स्नेहीजनांची देऊन सेवा संकल्प कलशामध्ये 1 लाख 33 हजार 753 रुपये मदत जमा झाली. ती मदत सेवा संकल्पाच्या सातव्या वर्धापन दिनी पद्मश्री प्रकाश आमटे, रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर वप्रकल्पाचे संचालक नंदकिशोर व आरती पालवे, यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.