सध्याचे सरकार हे चोरांचे सरकार, हे सरकार बदलायला हवे

 

‘‘महाराष्ट्र  सरकार लोकांच्या प्रश्नांत गुंतण्यापेक्षा स्वत:च्या पक्षातील गुंत्यामध्ये अडकले आहे,’’ असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले. महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने आज विधान भवनावर मोर्चा काढला. या वेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते असे म्हणाले की, ‘‘सध्याचं सरकार हे चोरांचं सरकार आहे. हे सरकार बदलायला हवं.’’

आरएसएसवर हल्लाबोल करत प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘‘आरएसएसचा  एजेंडा आहे, ना त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यात सहभाग घेतला आहे ना ते सामाजिक लढय़ात सहभागी झाले आहेत. त्यामुळे ते लोकांच्या डोक्यात जे महापुरुष आहेत ते पुसून टाकण्याचा डाव खेळत आहेत.’’ मंत्री चंद्रकांत पाटील  यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, चंद्रकांत पाटील  मला तुमचा शिवाजी पार्कवर जाहीर सत्कार करायचा आहे. 5 लाख लोक येतील. दादा तुम्हाला काहीच त्रास होणार नाही. मी म्हणतो, चंद्रकांत पाटील खरे म्हणाले. त्यांनी कबुली दिली की, भाऊराव पाटील आणि बाबासाहेबांच्या संस्था लोकवर्गणीतून उभ्या झाल्या. मात्र हे म्हणताना चंद्रकांत पाटील यांनी हे कबूल केले की आरएसएसच्या सर्व संस्था खोका संस्कृतीतून निर्माण झाल्या आहेत.