
शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसापासून बदलाच्या राजकारणाला सुरुवात करत असल्याची ग्वाही वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सुरुवातीलाच दिली. यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्या राजकारणाला कलाटणी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सामाजिक प्रश्नाला जेव्हा हात घातला जातो, तेव्हा समाजव्यवस्थेमधील गणितं बदलतात. त्यापार्श्वभूमीवर गेली अनेक वर्षे उपेक्षितांच्या राजकारणाला सुरुवात व्हावी, त्यांना मुख्य प्रवाहात आणता यावे म्हणून आम्ही प्रयत्न केला. त्यासाठी अनेक आंदोलने केली, चळवळी केल्या. मात्र त्यामध्ये अडथळे आले. तरीही त्याला आम्ही जुमानले नाही, लढत राहिलो म्हणूनच इथंपर्यंत पोहचलो असून आज शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र आली असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. उपेक्षितांसाठीच हा सगळा खटाटोप सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी ‘शिवशक्ती-भीमशक्तीचा विजय असो’, ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’, ‘शिवसेनाप्रमुखांचा विजय असो’, अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
निवडणुका जिंकणे जनतेच्या हातात
एकदा निवडणूक आखाडय़ात उतरल्यानंतर उमेदवार देणे हे राजकीय पक्षाच्या हातात असते, तर निवडणूका जिंकवणे हे जनतेच्या हातात असते. त्यामुळे राजकीय पक्षांकडून उमेदवारी देताना त्याचे सामाजिकरण होईल, सार्वत्रिकरण होईल अशी मला अपेक्षा असल्याचे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. तसेच सुरूवातीला महाराष्ट्राचे राजकारण 169 कुटुंबाच्या हातात होते, त्यामध्ये केवळ दहा कुटुंबांची भर पडली आहे. आज केवळ आपल्या कुटुंबांचे, नातेवाईकांचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे गरिबांचे राजकारण बाजूला पडले असून लुटारूंना, भांडवलदारांना वाव मिळाला आहे. त्याला बाजूला करून सर्वसामान्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.
दावोसला जाऊन मोठी गुंतवणूक येत नाही, तेथे केले जाणारे करार केवळ कागदावरच असतात. त्यामुळे आपण परदेशी गुंतवणूकीकडे डोळे लावून बसणे काही उपयोगाचे नाही असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी दावोस परिषदेतून मोठी गुंतवणूक आणल्याचा दावा करणाऱ्या मिंधे सरकारला लगावतानाच त्यांनी शेतीशी निगडित प्रक्रिया उद्योग उभारल्यास मोठय़ा प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल असे सांगितले.
विधान परिषदेच्या निवडणुकीत नाशिकला वंचितचा उमेदवार रिंगणात आहे. याबाबात विचारले असता सदरचा उमेदवार शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येण्याआधीचा आहे. त्यामुळे तेथे आमचा उमेदवार कायम राहिल, पण पुढील वाटचाल मात्र नव्या रस्त्याने होईल असे प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केले.
प्रबोधनकारांनी दाखवलेल्या हिंदुत्वाच्या मार्गाने पुढे जाणार
हिंदुत्ववादी शिवसेनेसोबत वंचित आघाडी कशी काम करणार असे प्रकाश आंबेडकरांना विचारले असता, प्रबोधनकारांनी दाखवलेल्या हिंदुत्वाच्या मार्गाने वंचित आघाडी आणि शिवसेना पुढे जाणार असल्याचे आंबेडकार यांनी स्पष्ट केले. तसेच आम्ही आरएसएस आणि भाजपच्या नकारात्मक राजकारणापासून दूर असल्याचेही त्यानी स्पष्ट केले.
मोदी सरकारचा ईडीच्या माध्यमातून राजकीय नेतृत्व संपवण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. एखाद्याने गैरव्यवहार केला असेल तर त्याला कोर्टात खेचले पाहिजे, शिक्षा दिली पाहिजे. पण आता तसे न करता केवळ राजकीय नेतृत्व संपवण्यासाठी त्यांची बदनामी करण्याचे काम सुरू असून ते देशासाठी धोकादायक आहे.
विरोधी पक्षनेतृत्वाचं काय? मोदींनी त्यांच्या पक्षातीलही नेतृत्व संपवले आहे. त्यांचे काही मंत्री खासगीत सांगतात की, आम्हाला केवळ फाईल उचलून नेण्याचे काम आहे.
पवार सोबत येतील
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि आमचे जुने भांडण आहे, मात्र ते शेतातील नाही, तर राजकीय नेतृत्वाचे आहे. तरीही आजची देशातील राजकीय परिस्थिती पाहता ते नक्कीच शिवशक्ती-भीमशक्तीसोबत येतील अशी मला अपेक्षा आहे. काँग्रेसनेही सोबत यावे.























































