हिटलरने जे केले ते पंतप्रधान मोदी करण्याची शक्यता, प्रकाश आंबेडकर यांचा गंभीर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिटलरने जे केले, ते सगळे करण्याची शक्यता आहे. दिवाळीपूर्वी अटकसत्र सुरू होणार असून, ते निवडणुकीपर्यंत राहील. गोध्रा हत्याकांड, मणिपूर दंगल घडली, त्याप्रमाणे पुन्हा दंगल घडण्याची शक्यता असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केला. दरम्यान, ‘इंडिया’ आघाडी शेवटपर्यंत टिकावी, ही अपेक्षा आहे. आपण इंडिया आघाडीत सामील होण्यास तयार आहोत, असेही ते म्हणाले.

सातारा येथील गांधी मैदानावर आयोजित जाहीर सभेत ऍड. आंबेडकर बोलत होते. आंबेडकर म्हणाले, ‘2024ची लोकसभा निवडणूक जिंकावी, यासाठी नरेंद्र मोदी हे हिटलरने जे केले तेच करणार आहेत. जो विरोधात जाईल त्याचा आवाज दाबला जाईल. देशातील पाच हिंदू मंदिरांवर कारवाया करण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यामुळे ही मंदिरे मिलिटरीच्या ताब्यात द्यावीत, अशी मागणी मी केली. तेथे बॉम्ब फोडून हिंदू-मुस्लिम दंगल घडविण्याचा प्रयत्न होता. मात्र, तो बॉम्ब निःशस्त्र्ा केला,’ असे आंबेडकर म्हणाले.

राज्यात खासगीकरण सुरू झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदेही कंत्राटी पद्धतीने भरावीत. बेरोजगारासाठी रोजगार देण्यासाठी शासनाकडे योजना नाही. कंत्राटी कर्मचारी भरले आहेत. ग्रामसेवक पदभरतीत टीसीआय कंपनीने 120 कोटींचा नफा कमवला. राज्यातील शासकीय भरती प्रक्रिया एमपीएससीमार्फत राबविली पाहिजे. हे चोरांचे राज्य आहे. कंत्राटी पद्धतीला घटनेने वाव दिला नाही. कंत्राटदार कामगारांना दिला जाणारा पगार बेकायदेशीरपणे दिला जात आहे.

निवडणुकीत आमदार, खासदारांचा नवीन लॉट आणला पाहिजे

– नांदेडची घटना दुर्दैवी असून, ‘तू माझी पाठ खाजवू नको, मी तुझी पाठ खाजवत नाही’, असे धोरण सरकारकडून आखले जात आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत खासदार, आमदार होलसेलरीत्या बदल करून नवीन लॉट आणला पाहिजे, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. तसेच एमआयएमशी आता आमचे कोणतेही संबंध नाहीत, असा निर्वाळा त्यांनी दिला. जातीनिहाय गणना झाल्याशिवाय महिलांनाही आरक्षणाचा लाभ होणार नाही.

चीनकडून भाजप सरकार पैसे घेते…

गलवान खोऱयात हिंदुस्थानी आणि चीन सैन्य भिडले, तेव्हाच चीनमधून पैसे येऊन देशविरोधी कारवाया केल्या जात होत्या. युद्ध सुरू असताना कोणता निधी येत होता, याचा खुलासा नरेंद्र मोदी यांनी करावा. चीनमधून आलेल्या निधीवर काहीजण चॅनेल चालवित आहेत, म्हणून त्यांची चौकशी केली जात आहे. त्या निधीतून देशविरोधी कारवाया होत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. चीनकडून भाजप सरकारसुद्धा पैसे घेत आहे. मग हे पैसे सरकार देशविरोधी कारवाईसाठी घेत आहे का? याचा खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली.