
सामना ऑनलाईन । कोलकाता
केंद्र सरकार आणि पश्चिम बंगाल सरकार दोघांमधील वाद आता आणखीनच चिघळू लागला आहे. भाजप आणि टीएमसीचे नेते एकामेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडू लागले आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. चीटफंड घोटाळ्याची सर्व गुपितं लाल डायरी आणि पेन ड्राईवमध्ये आहेत, तर मग ममता बॅनर्जी कोणाला वाचवताहेत? असा सवाल जावडेकर यांनी केला आहे. ही त्यांची पश्चिम बंगालमधील आणीबाणी आहे, आमची नाही, असेही जावडेकर म्हणाले.
P Javadekar: Whatever is happening in Kolkata&WB is one of a kind. Never before was an investigating team taken into custody by police. It’s murder of democracy. We want to ask Mamata Banerjee why is she staging dharna, who does she want to shield? Police Commissioner or herself? pic.twitter.com/hSwaqqPxc3
— ANI (@ANI) February 4, 2019
कोलकात्यामध्ये लोकशाहीची हत्या झाली आहे, असा आरोप जावडेकर यांनी केला आहे. तसेच ज्यावेळी टीएमसीचे मोठे नेते जेव्हा जेलमध्ये गेले तेव्हा ममता बॅनर्जींनी धरणे आंदोलन नाही केले. मात्र पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या बचावासाठी सीबीआयच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलनासाठी बसल्या आहेत. कारण चीटफंड मालकांनी सांगितले होते की, एका लाल रंगाच्या डायरीत आणि पेन ड्राईवमध्ये या घोटाळ्याविषयी महत्त्वाची माहिती आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तांकडील ही माहिती लपवण्यासाठी ममता बॅनर्जी रस्त्यावर उतरल्या आहेत, असा आरोप जावडेकर यांनी केला आहे.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एखाद्या अधिकाऱ्याच्या बचावासाठी स्वत: आंदोलनाला बसल्याचे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले आहे. हा चीटफंड घोटाळा 40 हजार कोटी रुपयांचा घोटाळा आहे. या घोटाळ्यामध्ये 20 लाखांहून अधिक लोकांचे पैसे बुडाले असून जवळपास 100 जणांनी यामुळे आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे ममता बॅनर्जी या प्रकरणातून स्वत:ला वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असून तपास होऊ देत नाहीत, असा घणाघात जावडेकर यांनी केला आहे.

























































