प्रणवदा ‘दक्ष’… संघाला राष्ट्रवाद, देशभक्तीचे धडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नागपूर

प्रत्येकाने देशाविषयी निष्ठा बाळगणे हीच देशभक्ती आहे. एक धर्म, एक जात, एका भाषेच्या आधारे राष्ट्रवादाची व्याख्या करणे चुकीचे आहे. विविधता, सहिष्णुता हीच हिंदुस्थानची ओळख आहे अशा शब्दांत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात राष्ट्रवाद आणि देशभक्तीचे धडे दिले.

नागपुरातील रेशीमबागेतील संघ मुख्यालयात तृतीय वर्ष शिक्षित संघ स्वयंसेवकांच्या शिबिराचा समारोप माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. प्रणवदा संघाच्या कार्यक्रमात कोणते बौद्धिक घेणार याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले होते. काँग्रेस पक्षातील नेत्यांसह प्रणवदा यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनीही या उपस्थितीवर टीका केली होती. मुख्य कार्यक्रमापूर्वी प्रणवदा यांनी संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतींना वंदन करून डॉ. हेडगेवार हे भारतमातेचे महान सुपुत्र असे म्हटले.

  • देश, राष्ट्रवाद आणि देशभक्ती यावर बोलण्यासाठी मी येथे आलो आहे.
  • विविधता, सहिष्णुतेतूनच हिंदुस्थान बनला आहे. हीच आपली ओळख आहे.
  • संविधानामुळे राष्ट्रीय भावना अधिक दृढ झाली.
  • लोकशाही ही देशाला मिळालेली देणगी नसून हा परस्परांचा विश्वास बांधणारा सेतू आहे.
  • संविधान हे १३० कोटी देशवासीयांच्या आशा-आकांक्षांचे प्रतीक आहे. ही देशाच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेली मार्गदर्शिका आहे.
  • विविधता हे देशाचे सौंदर्य आहे. मतभेद, मतमतांतरे असू शकतात पण आपण सर्वजण एक आहोत.
  • असहिष्णुता, हिंसाचार, भेदभाव आणि तिरस्कारामुळे आपल्या देशाची राष्ट्रवादाची ओळख धोक्यात येईल.

प्रणव मुखर्जींना बोलावले याची चर्चा का? – सरसंघचालक
संघशिक्षा वर्गाच्या समारोपाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या भाषणानंतर सरसंघचालकांचे भाषण होते, मात्र यावेळी ही परंपरा बाजूला ठेवून सरसंघचालक मोहन भागवत यांनी आधी भाषण केले. यावेळी सरसंघचालक भागवत म्हणाले, प्रणव मुखर्जी हे ज्ञान आणि अनुभवसमृद्ध आहेत. त्यांना संघाने निमंत्रण दिले आणि ते आले. याचीच चर्चा का होत आहे? संघ फक्त हिंदू समाजाचे संघटन करण्यासाठी नाही तर संपूर्ण समाजाला एकत्रित उभा करण्यासाठी आहे. विविधतेतून एकता ही देशाची हजारो वर्षांची परंपरा आहे. हिंदुस्थानात जन्मलेली प्रत्येक व्यक्ती हिंदुस्थानी आहे. भारतमातेचा सुपुत्र आहे, असे भागवत यांनी सांगितले.