
सामना प्रतिनिधी । सोलापूर
देशात मोदीबाबा नावाचा डेंग्यूचा मोठा डास आलाय, अशा शब्दांत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधानांवर टीका केली. प्रणितीताईंची शिंदेशाही एवढ्यावरच थांबली नाही, तर त्यांनी सोलापुरातील खासदाराचा उल्लेख चक्क ‘बेवडा खासदार’, असा केला.
त्या म्हणाल्या, मोदींना ना बहीण आहे, ना बायको आहे ना मुलगी, त्यामुळे त्यांना महिलांना होणाऱ्या त्रासाबद्दल कळणार नाही. आई आहे, पण नोटाबंदीच्या वेळी तिला रांगेत उभं केलं होतं ते पण फोटोसाठी. जग फिरतात पण शेतकऱ्यांकडे येऊन त्यांची स्थिती पाहत नाहीत, असंही प्रणिती शिंदे म्हणाल्या.
सोलापूरचा खासदार बेवडा!
भाजपचे दोन मंत्री आणि एक बेवडा खासदार यांनी सोलापूरसाठी दमडीचाही निधी आणला नाही. काँग्रेसच्या काळातील कामांचे उद्घाटन ते करत आहेत, म्हणजे हे आयत्या बिळातील नागोबा असल्याची टीका प्रणिती शिंदे यांनी केली.
मुंबईत काय काय घडते ते उघड करायला वेळ लागणार नाही!
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बालिशपणाचे वक्तव्य शिंदे यांनी करू नये, अन्यथा मुंबईत काय काय घडते ते सोलापुरात उघड करायला वेळ लागणार नाही. यापुढे अशी टीका करू नये, अन्यथा गंभीर परिणाम होतील, असा इशारा खासदार शरद बनसोडे यांनी दिला.




























































