
>> प्रांजल वाघ
पेशवेकाळात नव्याने बांधलेला पहिला आणि शेवटचा डोंगरी दुर्ग मल्हारगड! दिवेघाटाचा संरक्षक, मराठा साम्राज्याचे तोफखाना प्रमुख सरदार भिवराव पानसे यांनी बांधलेला हा गड दिवेघाट चढून गेला की लगेच दृष्टिपथात येतो. पुणे-जेजुरी परिसरात एक दिवसाच्या भटकंतीसाठी मल्हारगडाची भेट अगदी योग्य ठरावी अशी.
पुण्यापासून अगदी तासाभराच्या अंतरावर (ट्रफिक नसताना!) लागतो तो दिवेघाट. पंढरीच्या वारीनिमित्त वारकरी दरवर्षी हा घाट चढून पंढरपूरकडे जात असतात हे सर्वांनाच ठाऊक आहे. पण दिवेघाट चढून आल्यावर, जवळच असलेल्या एका दुर्गाकडे सहसा कोणाचे लक्ष जात नाही! हा दुर्ग म्हणजे दिवेघाटाचा संरक्षक, मराठा साम्राज्याचे तोफखाना प्रमुख सरदार भिवराव पानसे यांनी बांधलेला आणि मराठय़ांनी बांधलेला शेवटचा दुर्ग – मल्हारगड!
घाट चढल्यावर पुणे-जेजुरी रस्त्यावर लगेच झेंडेवाडीकडे जाणारा फाटा डावीकडे लागतो. तो घेऊन लगेच काळेवाडीकडे कूच करायची. हा गाडी रस्ता पुढे अरुंद होतो, दोन्ही बाजूस असलेल्या अंजीर, सीताफळ यांच्या बागा बघत बघत आपण थेट गडाच्या पायथ्याशी येतो. इथून पुढे कच्चा रस्ता थेट गडाच्या चोर दरवाजाजवळ जातो. खालून चढायला पायवाटदेखील आहे. आम्ही गाडी खालीच लावली आणि साधारण 15-20 मिनिटात चोर दरवाजातून गडात प्रवेश केला.
समुद्रसपाटीपासून सुमारे 3300 फुट उंचीवर असलेला, पेशवेकाळात नव्याने बांधलेला पहिला आणि शेवटचा डोंगरी दुर्ग! आकाराने साधारण त्रिकोणी असून मुख्य तटबंदीच्या आत आयताकृती, बुरुजांनी सुरक्षित करून टाकलेला बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर दोन अत्यंत सुबक बांधीव विहिरी आहेत आणि एक बारव. तसेच बालेकिल्ल्यात वाडय़ाचे अवशेष, एक भूमिगत तळघर आणि विहीर आहे.
पश्चिमेकडे दिवेघाटाकडे तोंड करून उभा असलेला एक दरवाजा, रामोशीवाडीच्या बाजूने असलेला, बुरुजांत आणि संरक्षक भिंती मागे लपलेला सुंदर महादरवाजा आणि काळेवाडीच्या बाजूला असलेला चोर दरवाजा असे तीन प्रवेश मार्ग आपल्याला गडावर घेऊन जातात.
राक्षसभुवनच्या लढाईनंतर, माधवराव पेशव्यांची परवानगी घेऊन सरदार पानसे यांनी 1763 मध्ये हा किल्ला बांधायला घेतला. किल्ल्याला मल्हारगड नाव कसे पडले याची एक आख्यायिका आहे. किल्ल्याचा पायथा खोदताना अचानक डोंगरातून रक्त वाहू लागले! आपल्या कुलदैवतीचा – खंडेरायाचा -सरदार पानसे यांनी धावा करून त्यास नवस बोलले – “गडाचे काम निर्विघ्नपणे पार पडू डे. तुझे नाव गडाला देईन!”. बोलता बोलता रक्त वाहायचे थांबले आणि गडाला नाव मल्हारगड देण्यात आले!
जवळच असलेले सोनोरी गाव सरदार पानसेंचे इनामाचे गाव. तेथे त्यांचा राहता वाडा आहे. इथले लक्ष्मी नारायण मंदिर, मुरलीधर मंदिर पाहण्याजोगे आहे. पुण्यात असाल आणि फारशी दगदग नको असेल तर मल्हारगड, सासवड आणि सोनोरी परिसराला नक्की भेट द्या.