
>> प्रांजल वाघ
[email protected]
अप्रतिम स्थापत्यकलेचा नमुना असलेल्या मंदिरांचे, बारवांचे कनकगिरी पाहताना या किल्ल्याचे मराठय़ांशी वेगळेच नाते दिसून येते.
कोप्पळनजीक वसलेलं एक छोटं गाव कनकगिरी. प्राचीन काळातील ‘स्वर्णगिरी’, मौर्य साम्राज्याची दक्षिणेतली राजधानी, सातवाहन, गंग, चालुक्य आणि होयसळांचे समृद्ध राज्य शासन पाहिलेलं हे एक समृद्ध शहर. ‘तुम्हाला पाय असल्यास हम्पी बघा, पण तुम्हाला डोळे असतील तर कनकगिरी बघा!’ अशी एक जुनी म्हण आहे. हम्पीला गेलात तर खूप पायपीट करून तुम्हाला सगळ्या ऐतिहासिक वास्तू पाहाव्या लागतात, पण कनकगिरीला अशा अनेक वास्तू एकाच ठिकाणी, फार न फिरता पाहायला मिळतात.
कनकगिरी एसटी डेपोला उतरल्यावर उजवीकडे वळलात की समोर लागतो तो एक पूल, ज्याचं नाव कनकराया पूल. एका ओढय़ावर बांधलेला हा पूल बहुदा पूर्वी कनकगिरीच्या किल्ल्याच्या महाद्वाराला जोडणारा असावा. कारण पुलापलीकडे तटबंदी आणि बुरुज दिसतात. जवळच एक हनुमानाची मूर्ती आहे. बहुदा किल्ल्याच्या मुख्य द्वारातील.
इथून पुढे गेल्यावर लागतं ते कनकगिरीच्या पाळेगार नायकांनी 16 व्या शतकात बांधलेलं कनकाचलपती लक्ष्मी नृसिंह मंदिर. व्याल स्तंभांनी नटलेलं, विष्णूच्या दशावतारांची शिल्पं असलेलं, अंगणात सोन्याचा पत्र ल्यालेला गरुडस्तंभ असलेलं हे प्राचीन विष्णू मंदिर. इथे दर्शन घेऊन आल्या पावलांनी मागे फिरल्यावर एपीएमसी गाठायचं. तिथून पुढे सरळ चालत गेल्यावर लागते ती स्थापत्यशास्त्राची उत्तम नमुना असलेली ‘राजा वेंकटप्पा नायक बावी.’ पाळेगार नायकांपैकी असलेल्या वेंकटप्पा नायक याने 16 व्या शतकात ही आपल्या राण्यांसाठी ही बावी/बारव बांधली असं सांगतात. जवळ जवळ संपूर्णपणे भूमिगत असलेली ही बारव शिल्पांनी नटलेली आहे. गजासुर वधाचे शिल्प माझे सर्वात आवडते जरी असले तरी इथे ब्रह्म-विष्णू-महेश यांची अनेक शिल्पे आहेत. बारवेचं मुख्य आकर्षण इथला मनोरा आहे. बारवेचं पाणी ओढून वर घेऊन पलीकडे असलेल्या उद्यानांना सिंचन करण्यासाठी वापरलं जाई. या मनोऱयावर अनेक काम-शिल्पे कोरलेली आहेत. या मनोऱयावर असलेल्या कोरीव सिंहांच्या मुखात पूर्वी दगडी गोल होते. ते आता आढळत नाहीत.
इथून पुढे गेल्यावर विस्तीर्ण पुष्करणी असलेले अमृतेश्वर हे छोटेखानी शिवमंदिर दिसते. अन् त्याच्याही पुढे विस्तीर्ण मैदान दिसते, ज्याला ‘युद्धभूमी’ म्हणतात. इथेच कनकगिरी आणि मराठय़ांची नाळ जुळलेली दिसते. 1655 मध्ये पाळेगार नायकांनी आदिलशाही विरुद्ध बंड पुकारलं. आदिलशाहने त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अफझलखानाला धाडला आणि त्याच्यासोबत होते शहाजी महाराजांचे थोरले पुत्र, शिवाजी महाराजांचा मोठा भाऊ संभाजीराजे. कनकगिरीच्या आघाडीवर संभाजीराजांनी हल्ला करायचा आणि अफझलखानाने त्यांना कुमक पुरवायची अशी रणनीती ठरली. त्याप्रमाणे हल्लाबोल झाला, पण अफझलखानाचे आणि भोसले घराण्याचे मोठं वैर आणि हाच डाव खानाने साधला. मुद्दाम वेळेत कुमक पाठवली नाही आणि संभाजीराजांना एकाकी पाडले. तितक्यात किल्ल्यावरून थेट संभाजीराजांवर तोफ डागली गेली आणि तक्षणी ते धारातीर्थी पाडले! जिजाऊचा पुत्र, शिवरायांच्या बंधुंना दगाबाजी करून खानाने मारले.
आज त्याच रणभूमीवर काही झाडांच्या सावलीत शिवरायांचे ‘भाऊ संभा’ चिरविश्रांती घेत आहेत. त्यांची समाधी स्थानिक ‘शिवाजी अण्णा संभाजी समाधी’ म्हणून ओळखतात. पण आपलं दुर्दैव हे की, काही समाजकंटकांनी त्याला आज पिराचं रूप दिलं आहे.
कनकगिरीला कधी गेलात तर तिथली देवळे, बारवा नक्की पहा. पण शिवछत्रपतींच्या लाडक्या दादाचं दर्शन आवर्जून घ्या आणि त्यांना नमन करा.


























































