
चित्रपट, मालिकांचे शूटिंग बंद असल्याने रिकाम्या वेळेत अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आपली चित्रकलेची आवड जोपासतेय. कोरोनामुळे अनेकांना शारीरिक आणि आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागतेय. अशा गरजूंच्या मदतीसाठी प्रार्थनाने पुढाकार घेतला असून आपल्या पेंटिंग विकून त्यातून समाजकार्यासाठी ती पैसा उभारणार आहे.
सोशल मीडियावर पोस्ट करत प्रार्थनाने म्हटलंय, कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातलाय. हा काळ आपल्या सर्वांसाठी खूप कठीण आहे. अनेकांना शारीरिक व आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागतेय. अशा वेळी मी त्यांच्यासाठी काय करू शकते हा विचार नेहमी माझ्या मनात यायचा. लॉकडाऊनच्या काळात मी पेंटिंग करायला सुरुवात केली. त्याच वेळी मला माझ्या मैत्रिणीने या पेंटिग्ज विकून त्यातून गरजूंची मदत करण्याची कल्पना सुचवली.
पुढे तिने म्हटलंय, स्वत:चं आर्ट विकायला कोणालाच आवडत नाही. पण मी हे पेंटिंग पैसे कमावण्यासाठी विकत नसून यामधून मिळणारी सर्व रक्कम समाजकार्यासाठी वापरणार आहे.
तर ते पैसे तुम्ही समाजकार्यासाठी दान करत आहोत अशी भावना ठेवा. या उपक्रमामुळे मिळणारा आनंद, समाधान आणि तुमचे आशीर्वाद महत्त्वाचे आहेत.




























































