कलाकाराला आयुष्यात आणखी काय हवं, प्रसाद ओक यांनी व्यक्त केल्या भावना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्यांचे लाखो-करोडो चाहते आहेत, ज्यांना लोक देवासमान मानतात अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची म्हणजेच धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारायला मिळतेय ही माझ्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. ‘भगवान देता है तो छप्पर फाडके देता है’! एखाद्या कलाकाराला आयुष्यात आणखी काय हवं, अशी भावना अभिनेते प्रसाद ओक यांनी व्यक्त केली. ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटात प्रसाद मुख्य भूमिकेत आहे. यानिमित्ताने त्यांनी बुधवारी दैनिक ‘सामना’ कार्यालयाला भेट देऊन ‘धर्मवीर’चा प्रवास उलगडला.

माझ्या 30 वर्षांच्या अभिनय प्रवासात तब्बल 95 चित्रपटांनंतर पहिल्यांदाच ‘धर्मवीर’ मुळे मला टायटल रोल मिळाला. इतक्या वर्षांमध्ये टायटल रोल मिळाला नाही याची खंत नाही. मात्र ‘धर्मवीर’मुळे माझ्यातील अभिनेत्यावरचा अन्याय निश्चितच दूर झाला आहे. उशिरा का होईना मला न्याय मिळाला, असे प्रसादने सांगितले. ‘हिरकणी’, ‘कच्चा लिंबू’ आणि ‘चंद्रमुखी’मुळे गेली सहा-साडेसहा वर्षे मी दिग्दर्शनात व्यस्त होतो. मी आता अभिनय करत नाही असा अनेकांचा गैरसमज इंडस्ट्रीत झाला होता. हा गैरसमज दूर करण्याचे काम ‘धर्मवीर’ या चित्रपटाने केले आहे, असेही गप्पांच्या ओघात त्यांनी सांगितले.

भूमिकेसाठी तयारी कशी केली याची माहिती देताना प्रसाद म्हणाले, लूकचे संपूर्ण श्रेय आमचे मेकअपदादा विद्याधर भट्टे यांना जाते. दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या रिसर्चमुळे माझ्यासाठी अनेक गोष्टी सोप्या झाल्या. निर्माते मंगेश देसाई यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. आनंद दिघे यांचे फारसे व्हिडीओ उपलब्ध नाहीत. त्यांचे जे फोटो उपलब्ध आहेत त्याचे मी बारकाईने निरीक्षण केले. ते कार्यकर्त्यांसोबत कशा प्रकारे उभे राहतात, लहान मुलांशी कसे वागतात याचे निरीक्षण करून त्या गोष्टी पात्रात उतरवल्या. पुढे ते म्हणाले, आनंद दिघे डोळय़ांतून अनेकदा व्यक्त व्हायचे. त्यांच्या नजरेतूनच त्यांना काय हवंय ते समोरच्याला अचूक कळायचे. इतके त्यांचे डोळे बोलके होते. तासन्तास आयपॅडवर मी त्यांचे फोटो पाहायचो. त्यांच्या डोळय़ांतील भाव अचूक पकडायचा प्रयत्न करायचो.

मराठीसारखा दर्जेदार कंटेंट कुठेच नाही

सध्या बॉलीवूड विरुद्ध प्रादेशिक चित्रपट असा वाद सुरू आहे याबाबत प्रसाद म्हणाले, मराठी इंडस्ट्री इतके दर्जेदार कंटेंट अन्य कोणत्याही इंडस्ट्रीत नाही. मराठी दिग्दर्शकांनी वैविध्यपूर्ण चित्रपट केले आहेत, पण प्रेक्षकांची म्हणावी तशी साथ मिळत नाही. याउलट चित्र दाक्षिणात्य इंडस्ट्रीत दिसते. तिथे प्रादेशिक अस्मिता जपली जाते. आधी आपल्या चित्रपटांना प्राधान्य दिले जाते. आपल्याकडे मात्र असे होत नाही, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. कंटेंटपासून प्रमोशनपर्यंत मराठी चित्रपट कुठेच कमी पडत नाही. प्रमोशनसाठी वेगळय़ा वाटा शोधल्या जातायत. आता फक्त प्रेक्षकांची साथ महत्त्वाची आहे. ‘धर्मवीर’ला ती साथ नक्कीच मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

शरद पवार यांचा बायोपिक करायला आवडेल!

महाराष्ट्राच्या भूमीत अनेक मोठमोठे राजकारणी आहेत ज्यांनी खऱया अर्थाने तळागाळात पोहोचून जनतेसाठी काम केले. भविष्यात मला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका साकारायला नक्कीच आवडेल, अशी इच्छा प्रसादने यावेळी बोलून दाखवली. बायोपिकमध्ये लूक महत्त्वाचा असतो. मी शरद पवार यांच्यासारखा दिसत नाही. त्यामुळे मला त्यांच्यावरचा बायोपिक दिग्दर्शित करायला आवडेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.