रंगभूषेमुळे मी घडलो!

नाटकांची रंगभूषा नेहमीच आव्हानात्मक राहिली आहे. आपली कला प्रेक्षक थेट पाहत असतात.

रंगभूषा ही आभास कला आहे. ती वास्तवाच्या एवढय़ा जवळ गेली पाहिजे की,  समोरच्या व्यक्तिला हे वास्तव आहे की, आभास हे लक्षात यायला नको. ही कला साकारण्याची सुरुवात रंगभूमीपासूनच झाली. कौटुंबिक, ऐतिहासिक, पौराणिक अशा वेगवेगळ्या विषयांवरील नाटकांसाठी मला कलाकारांना रंगभूषेद्वारे साकार करण्याची संधी मिळाली.  त्यानंतर मालिका आणि सिनेमा क्षेत्रात मी आज काम करतो आहे. सध्या  समाजसेवा म्हणून लोढा कौशल्य विकास केंद्र या संस्थेतर्फे गरजू स्त्र्ायांना मोफत रंगभूषेचे धडेही देत आहे.

मालाडमधील उत्कर्ष मंदिर ही माझी शाळा. रंगभूषेची ओळख मला रंगभूषाकार श्रीकांत देसाई यांनी करून दिली. काळानुरुप यामध्ये होणाऱया नव्या बदलांना रंगभूषाकाराने समोरं जायला हवं.

कोणतीही कला साकारण्यापूर्वी कलाकार  पहिल्यांदा रंगभूषाकाराला भेटतो. त्यानंतर नाटकातील इतर विभागांशी त्याची ओळख होते. यासाठी आम्हाला त्यांच्याशी जुळवून घेणं, स्वतःचं व्यक्तिमत्त्व योग्यरित्या सादर करणंही महत्त्वाचं ठरतं. विद्याधर भट्टे आणि विक्रम गायकवाड यांना मी या क्षेत्रातील माझे दैवत मानतो. मला जेव्हा संधी मिळाली तेव्हा मी त्यांच्याकडे काम केलं. मला जेवढं त्यांच्याकडून शिकता येईल ते शिकत राहतो. त्यांच्याकडून प्रेरणा घेतो. संतोष गायके यांनी विशेष ओळख नसूनही माझ्यावर विश्वास ठेवून मला रंगभूमीवरची कामं दिली. पाठिंबा दिला. यातूनच माझी कला अधिकाधिक विकसित होत गेली. वाघांचे मुखवटे, मारुती, देवीदेवता अशा नाटकातील अनेक वेशभूषा रंगभूषेद्वारे साकारल्या आहेत.

नाटकासाठी करायचा मेकअप गडद असतो. कारण कलावंताला शेवटच्या रांगेतील प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचे असते. सध्या नाटकात मेकअप करण्याची पद्धत खूपच बदलली आहे. कारण मेकअपमध्ये नवनवीन तंत्रज्ञान, रंगांचे वेगवेगळे प्रकार विकसित होत आहेत.  आता नाटय़गृहात डॉल्बी डिजिटल साऊंट आले आहेत. पूर्वीच्या आणि आताच्या लाईट्समध्येही फरक आहे. या सगळ्यामुळे मेकअपचे तंत्रज्ञान बदलले आहे. त्यानुसार बऱयाचशा रंगभूषाकारांनी यामध्ये बदल घडवून आणले आहेत. माझं व्यक्तिमत्त्व सुधारण्यास या कलेचा  मला फारच उपयोग झाला.

खंत याच गोष्टीची वाटते की, आजच्या रंगभूषाकाराला योग्य मानधन मिळत नाही. जुन्या रंगभूषाकारांना काम मिळत नाही. नाटक, सिनेमा, मालिका कोणत्याही क्षेत्रात रंगभूषाकार मेकअपचं सामान स्वतः घेऊन येतात. तरीही आमच्या कलेचे योग्य पैसे आम्हाला दिले जात नाहीत.

आपली प्रतिक्रिया द्या