ऊसतोड बंद आंदोलन चिघळले; आंदोलकांची गव्हाणीत उडी, प्रसाद शुगर साखर कारखाना येथे तणाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ‘ऊसतोड बंद’चे आंदोलन वांबोरीच्या प्रसाद शुगर या खासगी साखर कारखान्यावर चिघळले. आंदोलक आणि पोलीस तसेच सुरक्षा रक्षकांमध्ये झटापट झाल्याने कारखान्यावर तणावाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलकांनी कारखान्याच्या गव्हाणीत उडी मारून कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना अटक केली.

स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली आज विविध मागण्यांबाबत वांबोरीच्या प्रसाद शुगर या खासगी साखर कारखान्यावर आंदोलन करण्यात आले.

गळीत हंगामात साखर कारखान्यात येणाऱया वजनकाटय़ात पारदर्शकता राहण्यासाठी उसाचे वजनकाटे ऑनलाइन करावेत तसेच 2021-22 हंगामात गाळपास झालेल्या उसाला एफआरपी अधिक 200 रुपये अंतिम भाव मिळावा या मागणीसाठी ‘ऊसतोड व ऊस वाहतूक बंद’ आंदोलनाला सुरुवात झाली. स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली प्रसाद शुगर साखर कारखान्यावर आंदोलन छेडण्यात आले. सकाळी कार्यकर्त्यांनी वांबोरी येथील प्रसाद शुगर कारखान्यावर आंदोलन सुरू केले. दरम्यान, कारखाना प्रशासन व कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होऊन झटापट झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेऊन गव्हाणीमध्ये उडय़ा मारत कारखाना बंद पाडला.

उसाला रास्तभाव, वजनकाटे ऑनलाइन करून शेतकऱयाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे रवींद्र मोरे यांनी सांगितले. यावेळी राहुल करपे, किशोर मोरे, सुभाष जुंधरे, राहुल चोथे, पप्पू करपे, जुगल गोसावी, प्रमोद पवार, सतीश पवार, प्रवीण पवार, सचिन पवळे, सुभाष चोथे आदी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

खटाव तालुक्यात आंदोलनाला प्रतिसाद

स्वाभिमानीच्या नेतृत्वामध्ये ऊसतोड बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. खटाव तालुक्यात या आंदोलनाला शेतकरी आणि कारखानदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. खटाव तालुक्यातील  पडळ, गोपुज आणि वर्धनी या साखर कारखान्यांनी आंदोलनाला पाठिंबा देऊन दोन दिवस ऊसतोडणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. कातर खटाव, अंबवडे, भोसरे, भुरकवडी, चितली येथे सभा घेऊन आंदोलनाची माहिती देण्यात आली. राज्य प्रवत्ते अनिल पवार, तानाजी देशमुख, दत्तूकाका घार्गे, वैभव पाटील, अविनाश बागल, सत्यवान मोहिते, जितेंद्र बागल, अजय पाटील आदी उपस्थित होते.