साय-फाय – डिजिटल अपहरणाचे नाटय़

>> प्रसाद ताम्हनकर

देशभरात लोकांना विविध गुह्यांत नाव आल्याचे सांगून, त्यांना भीती घालायची आणि पोलीस असल्याचे भासवून घरातच डिजिटल अरेस्ट करायचे आणि मग त्यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने भरमसाट रक्कम लुबाडायची हा प्रकार वेगाने फोफावत आहे. विविध सुरक्षा यंत्रणा, पोलीस यांच्याकडून याबद्दल जनजागृतीदेखील सुरू आहे. अशा फसवणुकीपासून वाचण्याचे उपाय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक यंत्रणा कार्यरत झालेल्या आहेत. मात्र सायबर गुन्हेगार सतत नव्या पद्धती सोडून लोकांना लुबाडण्याचे काम करतच आहेत. बिहारच्या चंपारण जिह्यात एका खोटय़ा अपहरणाचे नाटय़ रंगवून पैसा लुबाडण्यात आला आहे.

बिहारच्या चंपारण जिह्यातील मोतीहारी शहरात हा सायबर फसवणुकीचा गुन्हा घडला आहे. चंपारणच्या ढाका चंदनबाड येथील मूळ निवासी असलेल्या फिरोज आलम आणि आबू निसां या दांपत्याला पाच मुले आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी ते मोतीहारी येथे भाडय़ाने घर घेऊन राहत आहेत. फिरोज आलम हे कतारमध्ये टॅक्सी चालक म्हणून कार्यरत आहेत. 20 डिसेंबरच्या दिवशी या दांपत्याचा 14 वर्षांचा मुलगा संध्याकाळी 4 वाजता खेळायला म्हणून गेला तो रात्री उशिरापर्यंत परत आला नाही. मुलाच्या आईने आणि काकाने रात्रभर नातेवाईक, ओळखीचे लोक असा सगळीकडे त्याचा शोध घेतला. मात्र तो काही मिळाला नाही.

21 डिसेंबरला घाबरलेल्या नातेवाईकांनी मग पोलीस चौकीत जाऊन मुलगा हरवल्याची तक्रार दाखल केली. काही नातेवाईकांनी सोशल मीडियावरती पोस्ट टाकून मुलगा हरवल्याची आणि कोणाला कुठे आढळल्यास संपर्क करण्याची विनंती केली. बहुदा ही पोस्ट सायबर चोरटय़ांच्या नजरेस पडली आणि त्यांचे सैतानी डोके ताबडतोब कामाला लागले. इकडे मुलाच्या काकांच्या फोनवर एका स्थानिक नंबरवरून फोन आला, पण तो त्यांनी उचलला नाही. त्यानंतर +44 असा आंतरराष्ट्रीय कोड असलेल्या नंबरवरून 2 फोन आले आणि बोलणाऱया लोकांनी आम्ही तुमच्या मुलाचे अपहरण केले असल्याचे सांगितले. मुलाच्या काकाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर मग हीच धमकी देणारा फोन मुलाच्या आईला करण्यात आला आणि ती मात्र जाळ्यात सापडली.

घाबरलेल्या मुलाच्या आईकडे लाखो रुपयांची मागणी करण्यात आली. रकमेचा आकडा ऐकूनच ती हादरून गेली. त्याचवेळी तिला पुन्हा एक व्हिडीओ कॉल आला आणि हातात चाकू घेतलेल्या आणि बुरखा घातलेल्या एका व्यक्तीने तिला लांब अंधारात उभा असलेला एक लहान मुलगा दाखवला आणि पैसे न दिल्यास तुझ्या मुलाचा खून करू अशी पुन्हा धमकी दिली. धास्तावलेल्या आईने पन्नास हजार देण्याची तयारी दाखवली आणि ताबडतोब ऑनलाइन पैसेदेखील ट्रान्सफर केले. मात्र पैसे देऊन 2 तास उलटले तरीदेखील मुलगा परत न आल्याने तिने सायबर गुन्हेगारांनी दिलेल्या नंबरवर पुन्हा संपर्क साधला. तिच्याकडे आणखी 50 हजारांची मागणी करण्यात आली. मग मात्र तिने नातेवाईकांसह पोलीस चौकीत धाव घेतली आणि घडलेली घटना सांगितली.

पोलीस तपास सुरू असताना 22 तारखेला आबू निसांच्या फोनवर मुजफ्फरपूरवरून एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला आणि त्याने मुलगा फिरत फिरत त्याच्या दुकानापर्यंत पोचल्याचे आणि सुरक्षित असल्याच कळवले. मुलानेच दुकानदाराला आईचा नंबर दिला होता आणि संपर्क साधण्याची विनंती केली होती. काही वेळातच मुलगा सुखरूप त्याच्या घरी पोहोचला आणि सगळ्यांचा जीव भांडय़ात पडला. मात्र सायबर गुन्हेगारांनी वापरलेली ही नवी युक्ती पोलिसांना चांगलीच चक्रावून गेली आहे. पोलिसांनी आता गुन्हेगारांवर असलेला अपहरणाचा गुन्हा रद्द केला आहे आणि सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ज्या खात्यावर मुलाच्या आईने पैसे पाठवले होते ते खाते हैदराबादच्या एका बँकमधले असून खातेधारकाची ओळख पटवली जात आहे.

संकटाच्या काळात मदतीसाठीदेखील सोशल मीडियाची मदत घेणे आता किती धोक्याचे बनले आहे, हेच या घटनेने समोर आले आहे. आभासी जगात प्रत्येक पाऊल हे सावधपणे टाकायला हवे हा धडा सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवा आहे.

[email protected]