खुशाल शिक्षा करा, माफी मागणार नाही; प्रशांत भूषण यांची ठाम भूमिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
prashant-bhushan

मी केलेले ट्विट न्यायसंस्थेच्या भल्यासाठीच होते. लोकशाहीतील मुल्यांच्या रक्षणासाठी टीका गरजेची आहे. त्यामुळे मी माफी मागणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने खुशाल शिक्षा करावी, अशी ठाम भूमिका ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी घेतली आहे.

सर्वोच्च न्यायालय आणि सरन्यायाधीशांबाबत केलेल्या दोन ट्विटप्रकरणी प्रशांत भूषण यांना दोषी ठरविण्यात आले आहे. न्यायालयाचा अवमान केल्याचा ठपका त्यांच्यावर 14 ऑगस्ट रोजी ठेवण्यात आला होता. आज न्यायमूर्ती अरूण मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय खंडपीठापुढे शिक्षेबाबत सुनावणी झाली. यावेळी प्रशांत भूषण यांनी दुसऱया खंडपीठापुढे शिक्षेची सुनावणी करण्याची मागणी केली. ही मागणी न्यायालयाने फेटाळली. मात्र, पूर्ण पडताळणीशिवाय शिक्षा सुनावली जाणार नाही. आपण केलेल्या ट्विटबाबत फेरविचार करावा आणि त्यासाठी दोन-तीन दिवस घ्यावे असे न्यायमूर्ती मिश्रा म्हणाले. यावेळी भूषण यांच्यासह त्यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ राजीव दिवाण आणि दुषांत दवे यांनी बाजू मांडली. केंद्र सरकारच्या वतीने ऍटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी बाजू मांडली.

प्रशांत भूषण काय म्हणाले?
– न्यायालयाने दोषी ठरविलेल्या निर्णयामुळे मला प्रचंड वेदना झाल्या आहेत. मला शिक्षा सुनावली जाणार याचे दुःख नाही तर माझ्याबद्दल गैरसमज झाल्याचे मला दुःख आहे.
– मला न्यायालयाचा वेळ वाया घालवायचा नाही. मला कोणत्याही दयेची अपेक्षा न्यायालयाकडून नाही. शिक्षेचीही भिती नाही. मी माफी मागणार नाही.
– तुम्ही (न्यायालयाने) पुनर्विचार करण्यास सांगितले आहे तर करेन. पण मी भूमिका बदलेल असे वाटत नाही.
– लोकशाही आणि तिच्या मुल्यांच्या रक्षणासाठी टीका गरजेची आहे. माझे ट्विट हे नागरिक म्हणून मी कर्तव्य पार पाडले होते. यामुळे कोणाचाही अवमान होत नाही. या ऐतिहासिक वळणावर मी बोललो नसतो तर मी माझे कर्तव्य पार पाडण्यास अयशस्वी ठरलो असतो.

न्यायमूर्ती मिश्रा काय म्हणाले?
– प्रत्येक गोष्टीला ‘लक्ष्मण रेषा’ आहे. तुम्ही ही रेषा का ओलांडली? लोकांच्या हितासाठी चांगल्या खटल्याचा पाठपुरावा करणाऱयांचे न्यायालय स्वागत करते. मात्र, ही बाब गंभीर आहे. मी न्यायमूर्ती म्हणून गेल्या 24 वर्षांत एकलाही अवमानप्रकरणी दोषी ठरविलेले नाही.
– भूषण यांनी पुनर्विचार करावा असे आम्हाला वाटते. त्यांनी दोन-तीन दिवस विचार करण्यासाठी घ्यावेत.
– चूक कोणाकडूनही होऊ शकते. चूक करणार नाही अशी व्यक्ती जगात नाही. तुम्ही शंभर चांगल्या गोष्टी केल्यामुळे दहा गुन्हे करण्याचा परवाना मिळत नाही. पण पश्चातापाची भावना त्या व्यक्तीमध्ये असली पाहिजे असे आम्हाला वाटते, त्यामुळे पुनर्विचार करावा.