
अभिनेते प्रशांत दामले यांना कोरोनाची लागण झाली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते सात दिवसांच्या आयसोलेशनमध्ये आहेत. त्यामुळे उद्या बोरिवली येथील ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’चा प्रयोग रद्द करण्यात आला आहे. कोरोना चाचणीत मी काठावर पास झालोय. तसं काठावर पास मी शाळेपासूनच आहे, असे म्हणत दामले यांनी फेसबुक व्हिडीओच्या माध्यमातून आज ही माहिती दिली.
प्रशांत दामले यांनी मागील रविवारी ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’चा प्रयोग चिंचवड येथे केला होता. त्यानंतर त्यांना कणकण वाटू लागली. मुंबईत आल्यावर बुधवारी त्यांनी कोरोना चाचणी करून घेतली. त्याविषयी सांगताना दामले म्हणाले, कोरोना चाचणीत मी काठावर पास झालोय. तसं काठावर पास मी शाळेपासूनच आहे. पण हा काठ जरा डेंजर आहे.
डॉक्टर म्हणाले, काठावर असला तरी सात दिवसांच्या आयसोलेशनमधून जावे लागेल. मी बुधवारपासून आयसोलेशनमध्ये आहे. त्यामुळे झालंय काय की, उद्या दुपारचा आणि बुधवारचा बोरिवलीचा प्रयोग आणि परवा दुपारचा गडकरी रंगायतनचा प्रयोग मला करता येत नाही. सगळय़ात दिलासादायक बाब म्हणजे माझे सहकलाकार, बॅकस्टेज आर्टिस्ट ठणठणीत आहेत. मीच थोडासा काठावर आहे. काठावरचा मी थोडासा मागे येतो आणि परत काम सुरू करतो. मी काळजी घेतो आणि तुम्हीही घ्या.
नाटक अनलॉक झाल्यानंतर प्रशांत दामले यांच्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचा प्रयोग पुण्यात झाला आणि व्यावसायिक रंगभूमीची नांदी झाली. जवळपास आठ महिन्यांनी नाट्यगृहे सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर प्रशांत दामले आणि कविता लाड यांनी स्वत: नाट्यगृहांमध्ये जाऊन काही काळ तिकीट विक्री केली आणि तयारीचा आढावा घेतला होता. इतपंच नाही तर, प्रेक्षकांचे स्वागत करत पहिल्या पाच रसिकांना तिकिटे दिली होती. 19 डिसेंबर रोजी या नाटकाचा प्रयोग बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. त्या माध्यमातून मुंबईत व्यावसायिक नाटकाची नांदी दिली जाणार होती.
शो मस्ट गो ऑन…उद्या ‘इशारों इशारों में
बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात शनिवार, 19 डिसेंबर रोजी ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ नाटकाचा प्रयोग रद्द करण्यात आला. नाटक अनलॉक झाल्यानंतर हा मुंबईतील पहिला नाट्य प्रयोग ठरणार होता. मात्र हा प्रयोग आता होणार नाही. त्याच नाट्यगृहात 20 डिसेंबर रोजी ‘इशारों इशारों मे’ या नाटकाचा प्रयोग मात्र ठरल्याप्रमाणे होणार आहे. यादृष्टीने प्रेक्षक आणि कलाकारांच्या सुरक्षिततेची पूर्ण खबरदारी नाट्यसंस्था आणि नाट्यगृह व्यवस्थापनाकडून घेण्यात आली आहे.
गेल्या नऊ महिन्यानंतर मुंबईत होणाऱ्य़ा पहिल्या प्रयोगाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह देखील सज्ज झाले होते. ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचे बुकाRग चांगले झाले होते. याविषयी प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाचे सहाय्यक व्यवस्थापक संदीप वैशंपायन म्हणाले, प्रेक्षकांचे तापमान मोजण्यापेक्षा आम्ही ऑटोमेटीक टेम्परेचर गेझ बसवले आहे. जेणेकरून पुणाला ताप असेल तर तत्काळ समजेल आणि बॅरिकेट गेटमधून त्याला प्रवेश मिळणार नाही. याशिवाय नाट्यगृह नियमित सॅनिटाईज होत आहे. गेल्या दोन दिवसांत दोनदा सॅनिटायजेशन झाले आहे.
सागर कारंडे यांचा अभिनय असलेल्या ‘इशारों इशारों मे’ नाटकाचे बुकाRग चांगले झाले आहे. प्रयोग ठरल्याप्रमाणे होईल. आम्ही प्रत्येक बॅकस्टेज कलाकारांना फेसशील्ड उपलब्ध करून दिल्याचे सहनिर्माते मंदार काणे यांनी सांगितले.
सात दिवसांचा एकांतवास
प्रशांत दामले यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर डॉक्टारांनी त्यांना सात दिवस आयसोलेशनमध्ये राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे ते सध्या एकांतवासात आहेत. त्यांनी फेसबुकवर व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती दिली. एकांतवास संपल्यानंतर पुन्हा नाटक करेन, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
प्रयोग रद्द
‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचा बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात होणारा 19 डिसेंबरचा प्रयोग रद्द करण्यात आला आहे. याच नाटकाचा 20 डिसेंबर रोजी कल्याण येथे प्रयोग होता. तोही आता होणार नाही. प्रशांत दामले यांच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना चाहत्यांनी त्यांना लवकर बरे व्हा, अशा भरूभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
सगळय़ात दिलासादायक बाब म्हणजे माझे सहकलाकार, बॅकस्टेज आर्टिस्ट ठणठणीत आहेत. मीच थोडासा काठावर आहे. काठावरचा मी थोडासा मागे येतो आणि परत काम सुरू करतो. मी काळजी घेतो, तुम्हीही घ्या. – प्रशांत दामले






























































