
लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. प्रभाकर मांडे यांना नुकताच चतुरंग प्रतिष्ठानचा जीवन गौरव पुरस्कार घोषित झाला. त्यांच्यासोबतच दिग्दर्शक राजदत्त, दुर्गभ्रमक अप्पा परब यांचाही पुरस्कार विजेत्यांत समावेश आहे. तीन वर्षांच्या पुरस्काराचे वितरण मुंबईत डिसेंबर महिन्यात होत आहे. प्रा. मांडे यांचा नावलौकिक विद्यापीठ आणि अभ्यासकाच्या पातळीवर लोकसाहित्याचा अभ्यास करणारे संशोधक असा आहेच. लोकसाहित्याच्या संवर्धन आणि संगोपनासाठी मांडे सरांनी आजपर्यंत भरीव, ठसठशीत योगदान दिले आहे.
संशोधन प्रकल्प, कार्याच्या निमित्ताने त्यांनी महाराष्ट्रभर भटपंती केली. अनेक ठिकाणी प्रवास झाला. अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी यातून झालेले संशोधन, संशोधनातून आलेले लेखन, लेखनाची झालेली विपुल ग्रंथसंपदा व्यासंगताच स्पष्ट करते. लोकसाहित्याचा समग्र अभ्यास मांडणारी ही ग्रंथसामग्री या क्षेत्रात काम करणाऱया नव्या लेखक संशोधकांसाठी महत्त्वाची ठरणारी आहे. ज्या काळात मौखिक वाङ्मय परंपरेची अनेकांना माहिती नव्हती, त्या काळात मांडे सरांनी अत्यंत परिश्रमपूर्वक ग्रंथ लेखन केले. केवळ लोकसाहित्य हा विषय घेतला तर किती विविधता, विशेषतः यात दिसते. जसे लोकपरंपरा आणि सामाजिक परंपरा, लोक परंपरेतील शहाणपण, लोकपरंपरेतील स्त्री प्रतिमा, लोक गायकांची परंपरा, लोकमानस आणि लोकाचार, लोक मानस-रंग आणि ढंग, लोकरंग आणि अभिजात रंगभूमी, लोककला आणि नागर रंगभूमी (संपादित) लोकधारा, लोकरंगभूमी, लोकसंस्कृती आणि इतिहास दृष्टी, लोक संस्कृतीचे मूलतत्त्व, लोकसाहित्याचे अंतःप्रवाह, लोक साहित्याचे स्वरूप या मौलिक ग्रंथाचा उल्लेख करावा लागेल. त्याचप्रमाणे मौखिक वाङ्मयाची परंपरा, रामकथेतील मौखिक परंपरा ही पुस्तकेही अत्यंत मोलाची आहेत.
एवढेच नव्हेतर आदिवासी मूलतः हिंदूच, आदिवासीचे धर्मांतर एक समस्या उपेक्षित पर्व, मराठवाडय़ाची कलगीतुऱयाची आध्यात्मिक शाहिरी, पंडित दामोदर रचित महानुभावीय पद्मपुराण (संपादन), चतुरदास विरचित एकादश स्पंध भाषा टीका (हिंदी संपादन) ही पुस्तके महत्त्वाची आहेत. मराठवाडय़ाची कलगी-तुऱयाची परंपरा हा तर मांडे यांच्या पीएच.डी. प्रबंधाचा विषय होता. आणि तोच पुढील काळात ग्रंथरूपाने आला. मायबोलीचे व्याकरण (सहसंपादन), शिक्षण नीतीचे राजकारण, श्री सामर्थ्याचा लक्षण विचार, सांकेतिक आणि गुप्त भाषा, बिल्वदल, बुडालेला गाव, अशा कितीतरी ग्रंथसंपदेचा उल्लेख येथे देता येईल.
संभाजीनगर जिल्हय़ात सावखेड येथे 1933 साली जन्मलेले मांडेसर आज 88 वर्षांचे आहेत. विद्यार्थ्यांच्या संशोधन कार्यात मार्गदर्शन असो की लेखन-संशोधन असो, अभ्यास असो नाहीतर प्रवास असो, त्या प्रत्येक ठिकाणी त्यांचे योगदान लाभले. म्हणूनच त्यांची जनमानसात ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व, अशी ओळख सांगितली जाते. त्यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस तर तीन ठिकाणी तीन वेगवेगळय़ा कार्यप्रमांनी साजरी झाला. मांडे सर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयात शिकले. ज्या कार्यक्षेत्राचा त्यांनी ध्यास घेतला, त्या लोकसाहित्यात त्यांनी आजवर अद्वितीय, अजोड असे काम करून ठेवले आहे. मांडे यांनी लोकसाहित्य संशोधन मंडळाची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी लोकसाहित्याचे अभ्यासकांना एकत्र आणले. महाराष्ट्र आणि गोवा येथे लोकसाहित्य परिषदा घेतल्या. यातून अभ्यासकांना डॉ. अशोक रानडे, डॉ. गंगाधर मोरजे, डॉ. ताराबाई परांजपे, डॉ. दुर्गाबाई भागवत, डॉ. रा. चिं. ढेरे यांचे मार्गदर्शन लाभले.
पारंपरिक ओव्या, लोकगीतं, लोककथा यांचे आज संवर्धन, संगोपण होण्याची गरज आहे. ग्रामीण भागात हा मौलिक ठेवा जपला जातोय. पण त्याची ओळख शहरवासीयांनाही झाली पाहिजे. 1960 नंतर तत्कालीन मराठवाडा विद्यापीठात लोकसंस्कृतीचा अभ्यास या विषयाच्या संशोधनाला मान्यता मिळाली. मांडे यांनी पीएच.डी.साठी नाव नोंदवले. एक संशोधक विद्यार्थी म्हणून नाव नोंदणी करणारे ते पहिलेच होते. ते मिलिंद महाविद्यालयात असतानाच्या काळात त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आशीर्वाद लाभला. प्रा. वा. ल. कुलकर्णी यांच्यासारखे तसेच प्राचार्य म. भि. चिटणीस यांचे मार्गदर्शक लाभले. त्याच संचितावर मांडे सरांचा प्रवास पुढील काळात सुकर होत गेला. आज वयाच्या 88 व्या वर्षीही त्यांचा उत्साह नव्या पिढीस प्रेरणा देणारा असतो.
प्रशांत गौतम




























































