ठसा – सुलोचना चव्हाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रशांत गौतम

सोज्वळ, खानदानी असे लावणीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य जपणाऱ्या, ठसकेबाज गायनाने लावणीस प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या, लावणीसम्राज्ञी – पद्मश्री सुलोचना चव्हाण यांच्या निधनाने अभिजात सूर आपण गमावला आहे. मुंबईच्या गिरगाव, फणसवाडी येथील निवासस्थानी वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि मराठमोळी लावणी पोरकी झाली. सुलोचना चव्हाण यांनी लौकिकार्थाने संगीत, लोकसंगीताचे फार धडे गिरवले नाहीत. त्यामुळे त्यांचा कुणी गुरू नाही आणि शिष्यही नाही. सुलोचनाबाईंच्या नैसर्गिक गायनशैलीमुळे सी. रामचंद्र, मुश्ताक हुसेन, ज्ञानदत्त, एस. के. पाटील, पी. रमाकांत, निसार बझ्मी असे लोकप्रिय संगीतकार प्रभावित झाले होते. मोहम्मद रफी, मन्ना डे, शमशाद बेगम, गीता दत्त, श्यामसुंदर यांच्यासोबत त्यांना पार्श्वगायनाची संधी मिळाली. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी भोजपुरी रामायण गाईले. मराठीशिवाय हिंदी-गुजराती, भोजपुरी, तमीळ, पंजाबी भाषांमध्ये भजन, गझल असे प्रकार सुलोचनाबाईंनी हाताळले.

सुलोचना चव्हाण यांचा जन्म 13 मार्च 1933 रोजी मुंबईत झाला. त्यांचे बालपण ठाकूरद्वारच्या फणसवाडी परिसरात गेले. चाळ संस्कृतीत त्या वाढल्या. आईचा व्यवसाय फुलंविक्रीचा. लौकिक अर्थाने गाणे शिकल्या नाहीत. घरी रेडिओ, ग्रामोफोनवर जेवढे ऐकले तेवढेच आत्मसात केले. तन्मयतेने ऐकले. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच त्यांचा गायनप्रवास सुरू झाला. त्यांच्या बालपणात मुंबईत अनेक ठिकाणी मेळे होत असत. त्यांच्या घरचा श्रीकृष्ण बालमेळा होता. अभिनेत्री संध्यासोबत त्यांनी मेळ्यात काम केले. या माध्यमातून त्यांचे कलाक्षेत्रात पहिले पाऊल पडले. श्रीकृष्ण बालमेळ्याचे रंगभूषाकार दांडेकर हे चित्रपटसृष्टीशी संबंधित असल्याने आणि त्यांच्यामुळे त्यांनी श्यामबाबू भट्टाचार्य पाठक यांच्याकडे पहिले पार्श्वगायन केले. पार्श्वगायनाचा प्रारंभ त्यांनी हिंदीत केला. 1955 पर्यंतचा हा प्रवास त्यांना लावणी या प्रकाराकडे घेऊन गेला. चित्रपट संगीतात रममाण झालेल्या सुलोचनाबाईंना संगीतकार वसंत पवार यांनी केलेल्या आग्रहामुळे लावणीचा प्रवेश झाला. सुरुवातीला त्या यासाठी तयार नव्हत्या. मनाची तयारी होत नव्हती. मात्र पवारांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता. त्यांच्या आवाजात पहिलीच लावणी खड्या आवाजात सादर झाली. ती होती, ‘नाव गाव कशाला पुसता मी हाय कोल्हापूरची.’ ती ध्वनिमुद्रित झाली. त्यानंतर ‘फड सांभाळ तुऱ्याला गं आला’, ‘पाडाला पिकलाय आंबा’, ‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा’ अशा एकापेक्षा एक अभिजात लावण्यांनी महाराष्ट्राला पार वेडंपिसं करून टाकलं. सुलोचनाबाईंनी दमदार आवाजात गायलेल्या असंख्य लावण्या तुफान लोकप्रिय आहेत.

महत्त्वाचे म्हणजे हे सादरीकरण करताना त्यांच्या डोक्यावरचा पदरही ढळत नाही. लावणीतील ठसका आणि रंगतही कमी होत नाही. लय-ताल बिघडत नाहीत. खरे तर मराठमोळ्या फक्कड लावणीतील एक प्रकार म्हणजे शृंगाररस प्रभात लावणी होय. ‘फड सांभाळ तुऱ्याला’ असो ‘पदरावती जरतारीचा मोर’ असो ‘खेळताना रंग’ असो, ‘पाडाला पिकलाय आंबा’ असो नाही तर ‘कसं काय पाटील’ अशा सुलोचनाबाईंच्या लावण्या आपण जेव्हा ऐकतो तेव्हा त्यांचा दर्जा कळतो. त्यांनी सादर केलेली बोर्डावरची लावणी तर घराघरात पोहोचली, नव्हे मना-मनात रुजली. लावणी सादर करताना त्यांचा ग्रामीण रंगातला बाज हा अनेकांना भावत असे. बेगम अख्तर यांनी त्यांची गाणी, लावण्या ऐकून एका कार्यक्रमात दिलखुलास दाद दिली होती. ती दाद त्यांच्या आयुष्यात महत्त्वाची अशी होती. 1953 पासून मात्र त्यांच्या गायन कारकीर्दीला वेगळे वळण मिळाले. 1953-54 च्या सुमारास ‘कलगीतुरा’ या चित्रपटासाठी राजा बढे यांनी रचलेल्या काही लावण्या त्या गायल्या. श्यामराव चव्हाण या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. पुढे याच श्यामराव चव्हाणांशी त्यांचे लग्न झाले आणि सुलोचना कदमच्या सुलोचना चव्हाण झाल्या. 10 एप्रिल 1965 ला ‘सवाल माझा ऐका’ या चित्रपटाचा पुण्यात रौप्य महोत्सव झाला. त्याला आचार्य प्रल्हाद केशव अत्रे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्यावेळी त्यांनी सुलोचनाबाईंना ‘लावणीसम्राज्ञी’ हा किताब बहाल केला.

सुलोचनाबाईंना राम कदम कला गौरव, राज्य सरकारचा पार्श्वगायन पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कार, चिंचवड रोटरी क्लबचा जीवन गौरव असे अनेक पुरस्कार मिळले. सहा दशकांचा त्यांचा गायन प्रवास त्यांच्या ‘माझं गाणं – माझं जगणं’ या आत्मकथनात विस्ताराने आला आहे. त्यांच्या निधनाने लावणी पोरकी झाली, घुंगराचे बोल निःशब्द झाले. साठेक वर्षांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सुलोचनाबाई रसिकांच्या मनात अजरामरच राहतील.