प्राचार्य रा. रं. बोराडे

>>प्रशांत गौतम<<

ग्रामीण साहित्यात भरीव योगदान दिल्याबद्दल ‘पाचोळा’कार प्राचार्य रा. रं. बोराडे यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील हा अत्यंत प्रतिष्ठsचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार घोषित झाला आहे. लेखन आणि ग्रामीण साहित्य चळवळीत लक्षणीय योगदान दिल्याबद्दल हा सन्मान होत आहे. कथालेखन, कथाकथन तसेच कादंबरी, नाटय़, बालसाहित्य, विनोदी साहित्य, समीक्षा या सर्वच आघाडय़ांवर ते सतत सक्रिय राहिले. लेखन साहित्याचा प्रवास करीत असतानाच आपल्या समकालीन लेखकांचे, नव्या पिढीतील प्रतिभावंतांचे भरभरून कौतुक करणे, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारणे, ग्रामीण साहित्य चळवळीत शेवटच्या कार्यकर्त्यांपर्यंत पाठीशी राहणे असे कितीतरी पैलू बोराडे यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसतात. त्यामुळे त्यांच्या साहित्य लेखनात आणि दैनंदिन व्यवहारातही माणूस हाच सदैव केंद्रबिंदू राहिला आहे. नव्या पिढीत कुणी चांगले, सकस दर्जेदार लिहिणारे आढळले तर त्याला बोराडे यांची निश्चित प्रेरणा मिळते. वैजापूरच्या विनायकराव पाटील महाविद्यालयात प्रदीर्घ काळ प्राचार्य असताना त्यांनी नवलेखकांसाठी आत्मकथा लेखन शिबीर आयोजित केले होते. शिबिरातून लेखक घडत नाही, वाढत नाही हे जरी खरे असले तरी या लेखनविषयक शिबिरातून तत्कालीन नवोदित आणि आजचे प्रतिभावान लेखक, कवी प्रकाशात आले. भास्कर चंदनशिव, भीमराव वाघचौरे, इंद्रजित भालेराव यासारखी अनेक नावे सांगता येतील. वैजापूर, परभणी, संभाजीनगर येथे असतानाही त्यांनी आपला शैक्षणिक सेवाकाळ गाजवला. सेवानिवृत्तीनंतर प्राचार्य बोराडे राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष झाले. या चार वर्षांच्या काळात ते विविध साहित्यविषयक कार्यक्रमात सतत व्यस्त होते. अध्यक्षपदाच्या कार्यकाळात नवलेखकांसाठी विविध योजना तर त्यांनी राबवल्या. शासनाचे साहित्यविषयक प्रकल्प, उपक्रम उत्साहाने राबविले. लातूर जिह्यातील काटगाव या छोटय़ाशा खेडय़ातील एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. शालेय, महाविद्यालयीन शिक्षण बार्शी, सोलापूर भागात झाले, तर पदव्युत्तर शिक्षण संभाजीनगरमध्ये झाले. १९६३ च्या सुमारास परभणीच्या शिवाजी महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. या सात वर्षांच्या वास्तव्यात त्यांचा ‘मळणी’ हा कथासंग्रह ‘मौज’ने प्रकाशित केला आणि नंतरच्या काळात राज्य पुरस्काराचाही मानकरी ठरला. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या या महाविद्यालयात दिलेल्या सेवेनंतर ते वैजापुरात आणि त्यानंतर संभाजीनगरात देवगिरी महाविद्यालयात प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झाले. साहित्य आणि शैक्षणिक या दोन्ही क्षेत्रांतील त्यांची वाटचाल आणि केलेले कार्य अधोरेखित करणारेच ठरले. दोन्ही कार्यक्षेत्रातील राज्य पुरस्काराचे ते मानकरी ठरले. ‘पेरणी’, ‘मळणी’, ‘नाती-गोती’, ‘बोळवण’, ‘वाळवण’, ‘माळरान’, ‘राखण’, ‘कणसं’ आणि ‘कडबा’, ‘हरिणी’,  ‘अगं अगं म्हशी’ यासारखे ग्रामीण कथासंग्रह; ‘ताळमेळ’, ‘फजितगाडा’, ‘खोळंबा’, ‘गोंधळ’, ‘हेलकावे’ (विनोदी लेखन), ‘पाचोळा’, ‘सावट’, ‘आमदार सौभाग्यवती’, ‘चारा-पाणी’, ‘महानगाव’, रहाटपाळणा,’ ‘इथं एक गाव होतं’, ‘मरणदारी’, ‘वळणाचं पाणी’, ‘नामदार श्रीमती’, ‘रिक्त-अतिरिक्त’, ‘राजसा’, ‘कथा एका तंटामुक्त गावाची’, ‘करायला गेले माकड’ यासारख्या अस्सल ग्रामीण बाज, बोलीभाषा असलेल्या कादंबऱ्या आजही तेवढय़ाच वाचकप्रिय आहेत. ‘शाळेला चाललो आम्ही’ (किशोर कादंबरी), ग्रामीण साहित्य चळवळ (समीक्षा) आणि तीन अनुभव कथा अशी भरगच्च साहित्यसंपदा जाणकार आणि वाचकांसाठी महत्त्वाची ठरलेली आहे. ‘मळणी’ या कथासंग्रहाने कथाकार आणि ‘पाचोळा’ कादंबरीने कादंबरीकार अशी त्यांना प्रारंभीच्या वाटचालीपासून ओळख मिळाली. ‘आमदार सौभाग्यवती’ या कादंबरीवर आधारित त्याच नावाचे नाटक आणि ‘महानगाव’ या विनोदी कादंबरीवर ‘आम्ही सारे लेकुरवाळे’ ही दोन व्यावसायिक नाटके रंगभूमीवर आली. कथा-कादंबऱ्यांतून त्यांनी केलेले अस्सल चित्रण, त्यात असलेली मराठवाडय़ाची प्रादेशिकता, बोलीभाषेचा ढंग, ग्रामीण जीवनातील ताणतणाव, शैलीदार व्यक्तिचित्रण, माणसांच्या वागण्या-बोलण्यातील लकबी अशा अनेकविध गुणविशेषांनी त्यांचा ५० वर्षांचा लेखनप्रवास सशक्त आणि समृद्ध झाला आहे. कसदार आणि दमदार लेखनाने त्यांनी आपला प्रदेश जिवंत केला. कथा-कादंबऱ्यांतून उभी केलेली माणसं ही अनेकांना आपल्याच परिसरातील वाटतात.

आपली प्रतिक्रिया द्या