नीतिश कुमार भाजपच्या संपर्कात, पुन्हा युतीची शक्यता! प्रशांत किशोर यांचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार हे भाजपच्या संपर्कात असून गरज पडली तर पुन्हा त्यांच्यासोबत युती करतील, असा दावा राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी केला आहे. सध्या किशोर हे जनसुराज्य यात्रेअंतर्गत सध्या बिहारच्या दौऱ्यावर आहेत.

पीटीआय भाषा या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जदयूचे खासदार आणि राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांच्या माध्यमातून नीतिश कुमार यांनी भाजपसोबत संवादाचा रस्ता खुला ठेवला आहे. जे लोक हा विचार करत आहेत की नीतिश कुमार हे भाजप विरोधात राष्ट्रीय आघाडी बनवण्याच्या खटपटीत आहेत, त्यांना हे ऐकून आश्चर्य वाटेल की त्यांनी भाजपसोबत संवादाचा मार्ग मोकळा ठेवला आहे, असं किशोर म्हणाले आहेत.

ते पुढे म्हणाले की, त्याच कारणास्तव जदयू आणि भाजप वेगळे होऊनही हरिवंश यांना आपल्या पदाचा राजीनामा देण्यासाठी सांगितलं गेलेलं नाही. लोकांनी ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की जेव्हा अशी परिस्थिती येते तेव्हा ते भाजपकडे परत जाऊ शकतात आणि त्यांच्यासोबत युती करू शकतात, असा दावा प्रशांत किशोर यांनी केला आहे.

दुसरीकडे प्रशातं किशोर हे अशा अफवा पसरवत असल्याचं म्हणत जदयूने दाव्याचं खंडन केलं आहे. नीतिश कुमार यांनी आयुष्यात पुन्हा कधीच भाजपशी हातमिळवणी करणार नाही, अशी जाहीर घोषणा केली आहे. गेल्या 50 वर्षांपासून नीतिश कुमार हे सक्रिय राजकारणात आहेत. तर प्रशांत किशोर हे सहा महिन्यांपासून राजकारण करत आहेत. त्यामुळे त्यांनी त्याच भ्रमापोटी असा दावा केला आहे, असं स्पष्टीकरण जदयूचे प्रवक्ते के. सी. त्यागी यांनी केलं आहे.