
2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला कुठली तिसरी-चौथी नव्हे तर दुसरी आघाडीच पराभूत करू शकते. जो पक्ष नरेंद्र मोदी यांना हटवण्याचा विचार करीत असेल त्या पक्षाला दुसरा पर्याय म्हणून उभे राहावे लागेल. तरच हे शक्य आहे, असे मत निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी एका मुलाखतीत व्यक्त केले. देशात काँग्रेसची दुसरा पक्ष म्हणून मजबूत बांधणी आहे, असेही ते म्हणाले.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशांत किशोर यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी देशातील राजकीय सद्यस्थितीवर भाष्य केले. जर आपण भाजपला पहिली आघाडी मानत असू, तर भाजपला केवळ दुसरी आघाडी हरवू शकते. म्हणूनच दुसरी आघाडी बळकट करायला हवी. सध्या काँग्रेस हा चमत्कार घडवण्याच्या स्थितीत नाही. मी काँग्रेसला दुसरी आघाडी मानत नाही, परंतु गांधी परिवाराच्या देखरेखीखाली वाटचाल करीत असलेला काँग्रेस देशातील दुसरा सर्वात मोठा पक्ष आहे. संपूर्ण देशभर काँग्रेसची मजबूत बांधणी आहे, असे प्रशांत किशोर म्हणाले. देशात कुठलीही तिसरी किंवा चौथी आघाडी निवडणूक जिंकू शकते असे मला कधी वाटले नाही, असेही त्यांनी नमूद केले. ‘मिशन 2024’मध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला तिसऱया आघाडीच्या रूपात उभे करण्यासाठी तुम्ही मदत करत आहात का, या प्रश्नावर त्यांनी हे भाष्य केले.
राज्यांच्या निकालांवर लोकसभेची भविष्यवाणी करू शकत नाही
राज्यांच्या निवडणूक निकालाचा 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीशी कुठलाही संबंध जोडणे चुकीचे आहे. राज्यांच्या निकालांवर लोकसभेची भविष्यवाणी करू शकत नाही. मोदींना कुणी आव्हान देऊ शकत नाही असे नाही. मात्र कोणता नेता त्यांना पंतप्रधानपदाच्या खुर्चीवरून हटवू शकतो हे आताच्या घडीला सांगणे फार मुश्कील आहे, असे प्रशांत किशोर यांनी मुलाखतीत सांगितले.






















































