
नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा देशभरात लागू झाला आहे. देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. बिहारमधील सत्ताधारी संयुक्त जनता दलाचे (JDU) राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी याबाबत मोठे विधान केले आहे. बिहारमध्ये कोणत्याही परिस्थितीत सीएए आणि एनआरसी लागू होऊ देणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
संयुक्त जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात समर्थन देत सीएए कायदा मजूर करण्यास भाजपची मदत केली होती. यानंतर प्रशांत किशोर यांनी या कायद्याला विरोधात करत बिहारमध्ये हा कायदा लागू होणार नसल्याचे ट्वीट करून म्हटले आहे. अशातच बिहारमध्ये हा कायदा लागू होणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने संपूर्ण देशात नवीन नागरिकत्व कायदा लागू करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. केंद्र सरकार वारंवार सांगत आहे की, केंद्र सरकारने बनवलेल्या या नव्या कायद्याची अंमलबजावणी सर्व राज्यांनाही करावी लागेल.



























































