माझा आवडता बाप्पा

>>प्रशांत लळीत

सिंथेसायझर वादक प्रशांत लळीत यांना लताजींची गायकी आणि गणपतीचं बैठकीतलं रूप भावतं.

 • आपलं आवडतं दैवत? – गणपती आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर.
 • त्याचं कौतुक कशा पद्धतीने करायला आवडतं? –देवानेच त्यांची प्रत्येक गाण्यासाठी निवड केली आहे. गाताना श्वासाचा आवाज कधीच येत नाही. तसेच संगीतकाराला जशी गाण्याची चाल अपेक्षित आहे तसंच्या तसं त्या गातात. हरकती, ताना, आलाप माहीत असले तरी ते कुठे आवश्यक आहेत किंवा नाहीत त्यानुसारच त्या गातात.
 • संकटात त्यांची तुम्हाला कशी मदत होते असं वाटतं? – संकटात नाही, तरीही मी त्यांची गायकी सतत ऐकतो. त्यामुळे मला प्रेरणा मिळते. कधी निराशा वाटली तर त्यांचं गाणं ऐकल्यामुळे उत्साह वाढतो. पुन्हा नव्याने कामाला लागता येतं.
 • कला आणि भक्तीची सांगड कशी घालता? – रोज सकाळी देवपूजा करतो, गायत्री मंत्र म्हणतो. त्यामुळे मला खूपच उत्साहवर्धक वाटतं. मन पवित्र होतं. त्यानंतर रियाज खूप छान होतो. प्रत्येक वेळी रंगदेवतेला नमस्कार करूनच रंगमंचावर पाय ठेवतो. त्यामुळे देव आणि कलेचं गणित असतंच असं वाटतं.
 • तुमच्यातली कला साकारण्याकरिता त्याची कशी मदत होते?-  त्याचं नाव घेऊनच रियाज करतो. तो सतत पाठीशी आहे याचा मला भास होतो. कोणताही ताण आला की, देवाचं नाव घेतो. त्यामुळे माझा ताण नाहीसा होऊन मला शांत वाटतं. हाती घेतलेलं कामही छान होतं.
 • आवडत्या दैवताला प्रार्थना केल्यावर यश मिळालंय असा प्रसंग?- बरं नसतानासुद्धा कधीतरी कार्यक्रमाला जाण्याची वेळ येते.काही वर्षांपूर्वी कंबरदुखीचा त्रास असूनही कार्यक्रमाला जावंच लागलं. अशावेळी मी प्रार्थना केली. व्यासपीठावर बसेपर्यंत असं वाटतं होतं की, कसं होणार आता, पण नंतर कार्यक्रम सुरू झाल्यावर सगळं विसरायला झालं.
 • त्याच्यावर रागावता का? – हो, कधी कधी रागवतो. एखादं अपेक्षेपेक्षा यश मिळालं नाही तर रागावतो, पण हे चुकीचं आहे याची जाणीव उशिरा होते. देव असा आहे की, त्याच्याकडे राग,प्रेम सगळंच व्यक्त करता येतं.
 • देवबाप्पा तुमचे लाड कसे पुरवतो? – गणपतीचं दर्शन घेतलं की, मला छान वाटतं. आजपर्यंत मला जे काही मिळालंय ते त्याच्यामुळेच आहे. आयुष्यात मी खूप आनंदी, समाधानी आहे. हाच लाड पुरवण्याचा भाग आहे.
 • आवडत्या दैवताचे कोणते स्वरूप आवडते? – गणपतीचं साधं बैठकीतलं आणि छोटय़ा मूर्तीतलं रूप तसेच लताजींची कोणतीही गायकी मला प्रचंड भावते.
 • त्याच्यापाशी काय मागता? – फुल थ्रोट म्युझिक करायला मिळावं, जे सध्या मी करतोय आणि माझ्या माणसांसोबत छान क्षण घालवता यावेत.
 • त्याच्या आवडीचा नैवेद्य काय दाखवता?- मोदक.
 • नियमित उपासना कशी करता?- दररोज गायत्री मंत्र म्हणतो. संगीताचा रियाज घरी असलो की, करतो.कार्यक्रमातलं सादरीकरण माझ्यासाठी रियाजच आहे. मोठय़ा कलाकारांसोबत काम करताना नकळत जे शिकायला मिळतं तोसुद्धा रियाज मला आयुष्यभर विद्यार्थी म्हणूनच राहायचंय.